Mahim Majar : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बुधवारी गुढीपाडवा मेळावादरम्यान माहीम भागातील समुद्रात अनधिकृत बांधकाम झाल्याचं म्हणत एक व्हिडीओ दाखवला होता. तसेच हे बांधकाम एका महिन्यात न हटवल्यास त्याठिकाणी गणपती मंदीर बांधू, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर आता माहिम (Mahim) समुद्रातील वादग्रस्त मजारीभोवतीचं अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलं आहे. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई महापालिकेचं अतिक्रम विरोधी पथक माहीमच्या समुद्रात दाखल झालं होतं. त्यानंतर कारवाई सुरु करण्यात आली होती. अखेर माहिम दर्ग्यामागील वादग्रस्त जागेवरील कारवाई पूर्ण झाली आहे. दरम्यान, माहिम किनारा परिसर आणि दर्ग्याभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
काल रात्री निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. यासाठी सहा अधिकाऱ्यांचं एक पथक नियुक्त करण्यात आलं होतं. त्यानुसार आज सकाळपासून हे अतिक्रमण हटवण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी कर्मचाऱ्यांचं पथक याठिकाणी पोहोचलं आहे. तसेच या ठिकाणी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी माहीम दर्गा ट्रस्टकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. “राज ठाकरे यांनी मेळाव्यात ड्रोन व्हिडीओद्वारे दाखवलेली जागा 600 वर्षे जुनी आहे. ती जागा ऐतिहासिक आहे. आम्ही त्या ठिकाणी दर्गा बांधणार नाही. ती जागा चिल्ला आहे, त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण दिलं जात होतं” असं माहीम दर्गा ट्रस्टचे विश्वस्त सोहेल खंडवानी यांनी सांगितलं आहे. एवढंच नाही तर त्या जागेच्या आजूबाजूला अवैध बांधकाम झालं असेल तर त्यावर सरकारने जरुर कारवाई करावी असंही ते म्हणाले.