मुंबई | Raj Thackeray – मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आगामी निवडणुकांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आज (11 ऑक्टोबर) मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईक बैठक पार पडली. यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत स्वबळावर निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आहे.
वांद्रे येथील ‘रंगशारदा’मध्ये पार पडलेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना स्वबळावर लढण्याची तयारी करा असा आदेश दिला. निवडणूक लढण्यासाठी लागणारा पैसा आपण उभा करू असंही ते म्हणाले. तसंच सध्याच्या राजकारणाला लोक कंटाळले आहेत, लोक पर्याय म्हणून आपला विचार करतील, त्यामुळे सकारात्मक विचार ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, अशी सूचना राज ठाकरेंनी केली आहे.
“मी तुम्हालाच सत्तेच्या खुर्चीवर बसवणार. मी सत्तेच्या खुर्चीवर उडी मारून बसणार नाही”, असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) अप्रत्यक्षपणे टोला लगावला. तसंच लवकरच आपली सत्ता येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. शिवसेनेला सहानुभूती मिळतीये हा भ्रम आहे असंही राज ठाकरे म्हणाले.
यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सहा ‘एम’चा फाॅर्म्यूला दिला. मेसेज, मेसेंजर, मनी, मसल, माईंड आणि मेकॅनिक्स या सहा ‘एम’वर लक्ष केंद्रीत करण्यास पदाधिकाऱ्यांना सांगितलं. तसंच दसरा मेळाव्यावरही त्यांनी भाष्य केलं. “दसरा मेळावा लोकांनी ऐकलाच नाही. तिथे फक्त चिखलफेक होत होती, कोणतेही विचार मांडेल नाहीत. त्यामुळे आपले सकारात्मक तसंच हिंदुत्वाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवा”, असंही राज ठाकरे म्हणाले.