मुंबई | Raj Thackeray On Uddhav Thackeray – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 35 हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणीसाठी स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर बुधवारी रात्री ९.३० वाजता फेसबुक लाईव्ह करत उद्धव ठाकरेंनी राजीनाम्याची घोषणा केली. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर राज्यासह देशभरातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
“एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो,” अशी पोस्ट राज ठाकरेंनी शेअर केली आहे. राज ठाकरेंनी राजीनाम्याच्या निमित्ताने या पोस्टमध्ये अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या बंडखोर आमदारांंनी गटनेता म्हणून निवड केली आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांनी गोवा विमातळावर प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. तसंच एकनाथ शिंदे मुंबईसाठी रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे मुंबईत येऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.