मुंबई | Raj Thackeray – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना जोमानं काम करण्याची सूचना दिली आहे. यादरम्यान, राज ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलं असून मनसे कार्यकर्त्यांकडे सत्तेची चावी सोपवण्याचं आश्वासन दिलं आहे. राज ठाकरेंनी ट्विट करत मनसे कार्यकर्त्यांना विनंती केली आहे.
राज ठाकरेंनी ट्विट करत म्हटलं आहे की, “मी सर्व मनसैनिकांना आगामी निवडणुकीत प्रामाणिकपणे काम करण्यासाठी आणि आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी विनंती करतो. मी तुम्हाला शब्द देतो, हा राज ठाकरे निवडणूक जिंकेल आणि त्यानंतर सत्ता तुमच्या हातात सोपवेल”.
दरम्यान, याआधी राज ठाकरेंनी मुंबईत ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ‘मी तुम्हाला सत्तेच्या खूर्चीवर बसवणार’ असं म्हटलं होतं. “मी तुम्हालाच सत्तेच्या खुर्चीवर बसवणार. मी सत्तेच्या खुर्चीवर उडी मारुन बसणार नाही,” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं. लवकरच आपली सत्ता येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.