एकीकडे हिंदूंच्या मनातून पवार यांच्या पुरोगामी प्रतिमेचे भंजन करून त्यांना हिंदुत्ववादी ठरविण्याचा प्रयत्न केला जातो आहे, तर दुसरीकडे बहुजन समाजाच्या मनातून पवारांची सर्वसमावेशक भूमिका परास्त करण्याचा हा डाव असू शकतो. शरद पवार राज ठाकरे यांच्या प्रश्नांना उत्तरे देत असल्यामुळे हे अडकत चालले आहे. नरेंद्र मोदी यांना भीडभाड न ठेवता बोलणारे राज ठाकरे शरद पवार यांच्या वयाचा मान ठेवून जेवढे स्पष्ट बोलता येईल तेवढे स्पष्ट बोलून त्यांना उत्तर द्यायला लावतील आणि अडकवत नेतील. आपल्याला हे आगामी काळात पाहायला मिळेल. पण जाणता राजा अजाणतेपणी यात अडकेल? हे लवकरच कळेल.
ठाणे येथे राज ठाकरे यांनी महाघाडीविरोधात तुफानी भाषण करीत, भाजपच्या बाजूने जाणार्या प्रचाराला प्रारंभ केला आहे. या त्यांच्या भाषणात त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. इतर वेळी त्यांचे हे प्रश्न बालिश आहेत, असे म्हणत टाळले जातात. मात्र या सभेमध्ये त्यांनी थेट शरद पवार यांना लक्ष्य करीत हल्ला केल्यामुळे ही सभा आणि ठाकरे यांचे भाषण फारसे महत्त्वाचे नाही, असे विरोधक म्हणत असले तरी प्रत्येकाला त्याची दखल घ्यावी लागली आहे. यात दस्तूरखुद्द शरद पवार यांना त्यांच्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागली आहेत. त्यांनी खरे तर त्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे आवश्यक होते. परंतु अवघड जागी दुखणे आणि जावई वैद्य या परिस्थितीप्रमाणे त्यांची अवस्था राज ठाकरे यांनी करून ठेवली आहे. साहजिकच या अवस्थेतून अत्यंत हुशारीने बाहेर पडण्याचा मार्ग शरद पवार यांना निवडावा लागला. प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यावे लागेल. आता या उत्तरावर पुन्हा प्रतिप्रश्न निर्माण होणार आहेत आणि शरद पवार यांच्या त्यांनीच दिलेल्या उत्तराचे अन्वयार्थ विरोधक त्यांच्या सोयीप्रमाणे काढून पुन्हा एकदा शरद पवार यांना सामाजिक, धार्मिक, अखेरीस राजकीयदृष्ठ्या अडचणीत आणणार आहेत.
या सगळ्यांचा लसावि काढायचा ठरविला, तर शरद पवार यांना सापळ्यात अडकविण्याचा राज ठाकरे यांचा किंवा भारतीय जनता पक्षाने राज ठाकरे यांच्यामार्फत केलेल्या प्रयत्नांना यश आले, असे म्हणावे लागेल. गेल्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्राचे होऊ घातलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात थेट भूमिका घेतली होती. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या नकला त्यांनी त्यावेळीही सादर केल्या होत्या आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी राज ठाकरे यांना बारामतीचा पोपट असे संबोधले होते. त्यावेळी राष्ट्रवादीने फडणवीस यांच्या या विधानाचा फारसा कडाडून इन्कार केला नव्हता. दुसरी बाब म्हणजे नरेंद्र मोदी यांना थेटपणे कोणी बोलत आहे आणि आपल्या मनातले प्रश्न विचारत आहे, याचा आनंद सर्वसामान्यांना होत होता. मोदीविरोधक यामुळे खूश होते. निवडणुकीत राज ठाकरे यांच्या भाषणाचा नक्की उपयोग होईल, असेही त्यांचे गणित होते.
हे गणित फारसे सुटले नसले तरी वातावरणनिर्मितीसाठी त्याचा फायदा विरोधकांना नक्कीच झाला. त्यावेळी निवडणुकीत असलेले काँग्रेस-राष्ट्रवादी आणि त्यावेळी विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसने राज ठाकरे यांना पुरस्कृत केल्याची मोठी चर्चा होती. शरद पवार यांची पुरस्कृत मुलाखतही राज ठाकरे यांनी घेतली होती. त्यावेळी त्यांनी जे प्रश्न शरद पवार यांना विचारले त्याची उत्तरे एका वाक्यात होती. आज शरद पवार या प्रश्नांची दीर्घोत्तरे देत आहेत. राज ठाकरे यांनी त्याच प्रश्नांमधून शरद पवार यांना गुंतवण्याचा, अडकविण्याचा प्रयत्न केला आहे. शरद पवार नास्तिक आहेत. देवधर्मावर त्यांचा विश्वास नाही, या प्रकारचे पुरोगामी विचाराचे शरद पवार असल्याचे त्यांचे समर्थक अभिमानाने सांगत असत. मात्र राज ठाकरे यांनी शरद पवार नास्तिक आहेत, देवधर्म मनात नाहीत, असे जाहीर सांगितल्यावर मी कसा देवभक्त व धार्मिक आहे, हे सांगायचा प्रयत्न स्वतः शरद पवार करीत आहेत. फुले, शाहू, आंबेडकर यांची नावे भाषणात घेतली जातात, मात्र छत्रपती शिवाजीमहाराजांचे नाव का घेत नाही, यावर शरद पवार यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी ते शिवाजीमहाराजांचे कसे भक्त आहेत, हे सांगायला सुरुवात केली.
छत्रपती शिवाजीमहाराज म्हणजे हिंदूंचे दैवत आणि मुसलमानांना विरोध हे गणित असल्यामुळे पवार मुस्लिमांना न दुखावता बहुजन समाजाला कसे कुरवाळतात आणि मुख्य म्हणजे ते हिंदुत्ववादी आहेत, म्हणजेच मुसलमानांच्या बाजूने नाहीत हे दाखविण्याचा, तो सिद्ध करण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न शरद पवार आणि त्यांचे समर्थक यशस्वी करत आहेत. एकीकडे हिंदूंच्या मनातून पवार यांच्या पुरोगामी प्रतिमेचे भंजन करून त्यांना हिंदुत्ववादी ठरविण्याचा प्रयत्न केला जातो आहे, तर दुसरीकडे बहुजन समाजाच्या मनातून पवारांची सर्वसमावेशक, उदारमतवादी, सर्वधर्मवादी भूमिका परास्त करण्याचा हा डाव असू शकतो. शरद पवार राज ठाकरे यांच्या प्रश्नांना उत्तरे देत असल्यामुळे पवार आपल्याला सिद्ध करण्याच्या नादात अडकत चालले आहे. नरेंद्र मोदी यांना भीडभाड न ठेवता बोलणारे राज ठाकरे शरद पवार यांच्या वयाचा मान ठेवून जेवढे स्पष्ट बोलता येईल तेवढे स्पष्ट बोलून त्यांना उत्तर द्यायला लावतील आणि अडकवत नेतील आणि आपल्या जाळ्यात अडकवतील हे आगामी काळात पाहायला मिळेल. जाणता राजा अजाणतेपणी यात अडकेल का? हे आपल्याला लवकरच कळेल.