वस्तूंचा संग्रह असणारे ‘राजा दिनकर केळकर संग्रहालय’

राजा दिनकर केळकर संग्रहालय हे पुणे शहरातील एक वस्तुसंग्रहालय असून १८९६ ते १९९० च्या सुमारास पुण्यभूषण पद्मश्री डॉ. दिनकर गंगाधर केळकर ऊर्फ कवी अज्ञातवासी या गृहस्थाने उभारले आहे. डॉ. दिनकर केळकर हे कवी अज्ञातवासी नावाने कविता करीत असत. त्याचबरोबर दिनकर केळकरांना जुन्या वस्तू जमवण्याचा छंद जडला होता. त्यामुळे त्यांनी घरातील स्वयंपाकाच्या वस्तूंपासून ते राजघराण्यातील म्हणजे कोथरूड येथून मस्तानीचा महाल उचलून आणला आणि संग्रहालयात हुबेहूब तसा उभा केला होता. राजा दिनकर केळकर संग्रहालय हे नाव दिनकर केळकर यांच्या राजा नावाच्या अल्पवयात मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव होते. यामुळे त्याला हे नाव देण्यात आले.

या संग्रहालयात अनेक वस्तू संग्रहित केल्या आहेत. लाकडी नक्षीकामाचे छत, दरवाजे, खिडक्या, पंचमुखी मारुतीचे पुतळे, पितळी दीपस्तंभ, पाषाणाच्या मूर्ती आहेत. तसेच पुरातन भांडी, वस्त्रे, मुघलदिवे, वेगवेगळ्या संस्कृतीच्या पाऊलखुणादेखील पाहायला मिळतात. अनेक शस्त्रे, मूर्ती आहेत. रोजच्या वापरातील नाना चीजा जमा केल्या असून विविध प्रकारचे दिवे, अडकित्ते, गंजीफा, सोंगट्या, शस्त्रे, पानदाने, पेटारे, दरवाजे, मूर्ती, कात्र्या, कळसूत्री बाहुल्या अशांनी केळकरांचा खजिना समृद्ध, संपन्न केला आहे. १९२२ मध्ये एका खोलीत सुरू झालेले हे संग्रहालय, वाड्याच्या साऱ्या दालनांतून वाढवले गेले.

१८ व्या शतकातील नक्षीदार लाकडी दरवाजा येथे आहे. तसेच राणी एलिझाबेथ यांनीदेखील या संग्रहालयाला भेट देऊन त्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. या संग्रहालयात अनेक दालने असून त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, दक्षिण भारत वेगवेगळ्या राज्यांतून जमविलेल्या अनेक वस्तू आहेत. तसेच एक प्रसाधने व गुजरात दालन विभाग असून यात तळपाय घासण्यासाठी वापरीत असलेल्या वजाऱ्या, कुंकुमकरंडे, वेणीफणीच्या पेट्या, आरसे, सुरमादान, अत्तरदान, कंगवे, फण्या, स्त्रियांचे दागदागिने आहेत. या संग्रहालयाच्या माध्यमातून सांस्कृतिक, शैक्षणिक वारसा जपला आहे. हे संग्रहालय बाजीराव रोड, शुक्रवार पेठेत असून जाण्यासाठी अनेक सिटी बसेसचीदेखील सोय आहे. तर नक्की भेट द्या, या अप्रतिम राजा दिनकर केळकर संग्रहालयाला.

Dnyaneshwar: