“ये अंदर की बात है, राणे कुटुंब हमारे साथ है…”, ठाकरे गटाच्या आमदाराचं खळबळजनक वक्तव्य

मुंबई | Rajan Salvi On Narayan Rane Family – गेल्या काही महिन्यांपासून शिंद गट विरूद्ध ठाकरे गट असा सामना रंगताना दिसत आहे. तसचं या दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्रही सुरू आहे. यामध्ये राणे पिता-पुत्र देखील ठाकरे गटावर (Thackeray Group) मोठ्या प्रमाणात टीका करताना दिसत आहेत. याच दरम्यान, आता ठाकरे गटातील एका आमदारानं खळबळजन वक्तव्य केलं असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नारायण राणे (Narayan Rane), नितेश राणे (Nitesh Rane) आणि भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा सुरू आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या नेत्यांवर गंभीर आरोप आणि टीका केली जात आहे. आधी नितेश राणेंनी भास्कर जाधव घरातून बाहेर पडू शकणार नाहीत, अशा आशयाचं विधान केल्याचा दावा भास्कर जाधवांनी केला होता. त्याच दिवशी रात्री त्यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला. दगड, स्टम्प आणि काचेच्या बाटल्या बंगल्याच्या आवारात आढळल्या. त्यानंतर नितेश राणेंनीही ‘नेत्यांवर टीका कराल तर कार्यकर्त्यांना संताप येणार नाही का?’ असं म्हणत अप्रत्यक्षरीत्या या प्रकाराचं समर्थनच केलं. बेडूक, चरसी कार्ट, कोंबडीचोर या भास्कर जाधवांच्या टीकेला नितेश राणेंनी भटका कुत्रा म्हणत प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे राजकीय वर्तुळातही या भाषेवर आक्षेप घेण्यात येत आहेत.

दरम्यान, कोकणातील स्थानिक शिवसेना नेत्यांवर राणेंकडून सातत्याने टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींनी राणे कुटुंबीय ठाकरे गटासोबतच असल्याचं विधान केलं आहे. “नितेश राणे आमचा विरोधक आहेच. राणे कुटुंबीयांना समजायला हवं की आज नारायण राणे, नितेश राणे किंवा निलेश राणे या कुटुंबाला बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद लाभला म्हणून ते मोठे झाले. त्यामुळे त्यांनी माझ्यावर आरोप करणं फार चुकीचं आहे. मी शिवसेना प्रमुखांशी, शिवसेना पक्षाशी किती प्रामाणिक आहे हे त्यांना सांगण्याची गरज नाही. मी तर म्हणेन, ये अंदर की बात है, राणे कुटुंब हमारे साथ है”, असं साळवी म्हणाले.

Sumitra nalawade: