राजस्थान मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसली टॅक्सी; ७ जण जखमी

राजस्थान मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसली टॅक्सी

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या ताफ्यात तैनात असलेल्या एका वाहनाला चुकीच्या बाजूने येणाऱ्या टॅक्सीने धडक दिली. या अपघातात टॅक्सीत प्रवास करणाऱ्या दोघांसह अन्य पाच जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी स्वत: जखमींना रुग्णालयात नेले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या वाहनासह तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. त्यामुळे वाहनात उपस्थित असलेल्या काही पोलिसांनाही किरकोळ दुखापत झाली. याशिवाय दोन पादचाऱ्यांसह तीन पोलिसही या अपघातात जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे अपघाताच्या काही वेळापूर्वी उपराष्ट्रपतींचा ताफाही याच मार्गावरून गेला होता.

अपघातानंतर एनआरआय सर्कलजवळील वाहतूक नियंत्रणात आली असून मुख्यमंत्र्यांचा ताफाही परतला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही टक्कर खूप भीषण होती. टक्कर झालेल्या टॅक्सीचा वेग ताशी १२० ते १३० किमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

जखमींवर उपचार सुरु

गंभीर जखमी व्यक्तीला एनआरआय सर्कलजवळील जीवन रेखा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दुसऱ्या जखमीवर महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात जखमी झालेल्या पाच पोलिस कर्मचाऱ्यांनाही जीवन रेखा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी चार जणांना फ्रॅक्चर आणि किरकोळ दुखापत झाली आहे.

Rashtra Sanchar: