Bheed Trailer : कोरोना महामारीच्या संकटाने अवघ्या जगाला पुर्णपणे वेठीस धरलं होत. संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर निर्माण झालेली कठीण परिस्थिती ‘भीड’ चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी चित्रपटाद्वारे त्यावेळचे भयाण वास्तव लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ट्रेलरची सुरुवात देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या लॉकडाउनच्या घोषणेपासून सुरु झालेली पाहायला मिळत आहे.
हा चित्रपट येत्या 24 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर लाखो लोक आपआपल्या घरी परतण्यासाठी रस्त्यावर उतरलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत. याबरोबरच या लाखो सामान्य मजुरांना आणि हातावर पोट असणाऱ्या लोकांना त्या काळात नेमक्या कोणत्या यातना सहन कराव्या लागल्या आणि त्यानंतरची निर्माण झालेली कठीण परिस्थिती दिग्दर्शकाने चित्रपटाद्वारे लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या ट्रेलरमधून सरकारी यंत्रणा, राजकीय हेवेदावे, आणि लॉकडाउनदरम्यान सामान्य लोकांची मानसिकता अगदी अचूक टिपण्यात आली आहे. ‘भीड’ चित्रपटाची कथा लॉकडाऊनच्या काळात लोकांना ज्या वेदना सहन कराव्या लागल्या त्यांचे चित्रण आहे.
हा संपूर्ण चित्रपट ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात राजकुमार राव (Rajkummar Rao) हा एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar), दिया मिर्झा (Dia Mirza) यांचीही यात मुख्य भूमिका आहे. चित्रपटाच्या कथानकाला साजेसं असं खिळवून ठेवणारं पार्श्वसंगीतही आहे. याबरोबरच पंकज कपूर, आशुतोष राणा, विरेन्द्र सक्सेनासारखे मातब्बर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे.