ठाणे : (Raju Patil On Shrikant Shinde) कल्याण लोकसभा क्षेत्र आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महत्तवाचा भाग आणि उच्चशिक्षित मतदार असलेल्या पलावा वसाहतीमधील मालमत्ता कर कमी करण्यासाठी कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील प्रयत्न करत आहेत. याच विषयी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे मात्र या कामाचे श्रेय राजू पाटील यांना मिळू नये म्हणून कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनावर दबाव टाकून हे काम मार्गी लागणार नाही याची गनिमी पद्धतीने खेळी करत आहेत. याची चाहूल पाटील यांना लागल्याने संतप्त झालेल्या पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून खासदार शिंदे यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर टीकेचा प्रहार केला आहे.
‘नशिबाने तुम्हाला हत्ती दिले आहेत. तुम्ही चप्पल चोरायच्या गोष्टी करू नका,’ अशी खरमरीत टीका करत आमदार पाटील यांनी पुन्हा नव्या वादाला तोंड फोडले आहे. तीन वर्षांपासून पाटील कल्याण, डोंबिवली परिसरातील रखडलेली विकास कामे, खड्डे, रस्ते विषयांवरून ‘मीच केले, मीच निधी आणला’ असा छाती बडवून गवगवा करणाऱ्या खासदार शिंदेंवर फलक, पत्रके, ट्विटच्या माध्यमातून लक्ष्य करत आहेत.
खासदार शिंदे यांनी अलिकडे गनिम पद्धतीने लढून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आ. राजू पाटील यांच्या विकास कामांच्या नस्ती, कामांमध्ये खोडे घालण्यास सुरुवात केल्याने मंत्री चव्हाण, पाटील खासदाराच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराज आहेत. ही नाराजी पाटील यांच्या ट्विटमधून पुन्हा दिसून आली आहे. या गनिमी काव्याची अंमलबजावणी खा. शिंदे पालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्या माध्यमातून करत असल्याची जाणीव मंत्री चव्हाण, आ. पाटील यांना झाल्याने या रणांगणात आयुक्तांची कोंडी होत आहे. खासदाराचे बोट धरून आयुक्तपदाची खुर्ची मिळाल्याने आयुक्त खासदारांच्या हुकमाचे ताबेदार आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.