उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची माहिती
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गुरुवारी आचार्य धर्मेंद्र यांचे उत्तराधिकारी स्वामी सोमेंद्र यांच्या चादरपोशी कार्यक्रमात बोलत होते. मुख्यमंत्री योगी या वेळी म्हणाले, की देशाची फाळणी झाली तेव्हा संतांच्या आंदोलनात या खंडपीठाची मोठी भूमिका होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर उभारणीचे काम पुढे नेले आहे. अयोध्येतील राम मंदिराचे काम ५० टक्के पूर्ण झाल्याचीही माहिती या वेळी दिली आहे.
श्रीराम जन्मभूमी आंदोलन १९४९ पासून सुरू झाले. १९८३ मध्ये रामजन्मभूमी समिती स्थापन झाल्यानंतर आंदोलन पुढे सरकले. संपूर्ण देशभरात या आंदोलनाला विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात संत-महतांनी धार दिली. खूप जण म्हणायचे, की काही फायदा होणार नाही. मात्र आम्ही तर भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या उपदेशावर विश्वास ठेवतो. संतांनी आपल्या आंदोलनाद्वारे हे सिद्ध केले आणि परिणाम तर दिसणारच होता, असे योगींनी सांगितले. याशिवाय श्री पंचखंड पीठाने देशाच्या कल्याणासाठी विविध चळवळींमध्ये जनतेचा सहभाग वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली, असेही योगींनी या वेळी सांगितले.
दरम्यान, स्वामी विवेकानंदांनी ज्या प्रकारे समर्थ रामदासांची परंपरा पुढे नेली, त्याच पद्धतीने स्वामी सोमेंद्र आता आचार्य धर्मेंद्र यांची परंपरा पुढे नेत आहेत. आचार्य धर्मेंद्र यांचे उत्तराधिकारी स्वामी सोमेंद्र यांच्या चादरपोशी सोहळ्याला मुख्यमंत्री योगी यांनी हजेरी लावली होती. योगी आणि खासदार बाबा बालकनाथ गुरुवारी सकाळी लखनौहून हेलिकॉप्टरने जयपूर जिल्ह्यातील विराटनगर शहरामधील पंचखंड हनुमान मंदिराजवळील (भीम डुंगरी) हेलिपॅडवर उतरले. येथून पंचखंड हनुमान मंदिरात ते पोहोचले. या वेळी त्यांनी १५ मिनिटे सभेला संबोधित केले. योगी आदित्यनाथ यांच्यासोबत मंचावर अल्वरचे खासदार महंत बालकनाथ उपस्थित होते.