मुंबई | Ramdas Athawale And Raju Shetti Play Important Role In Marathi Movie – सध्या मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन विषयावर आधारित असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यातच आता आणखी एका मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातून महाराष्ट्राच्या राजकारणामधील दोन नावाजलेली नावं रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहेत. ‘राष्ट्र – एक रणभूमी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटामध्ये मराठीमधील आघाडीचे कलाकार काम करताना दिसतील.
‘राष्ट्र- एक रणभूमी’ हा चित्रपट कोरोमुळे रखडलेला होता. मात्र आता हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. राजकारण तसंच राष्ट्रभक्तीवर आधारित हा चित्रपट आहे. राजकारणावर भाष्य करणाऱ्या ‘राष्ट्र – एक रणभूमी’मध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी दिसणार आहेत.
दरम्यान, या चित्रपटात रामदास आठवले आणि राजू शेट्टी यांची नेमकी भूमिका काय असेल हे लवकरच स्पष्ट होईल. ‘राष्ट्र – एक रणभूमी’ या चित्रपटाची निर्मिती निर्माते बंटी सिंग यांनी इंदर इंटरनॅशनल या बॅनरखाली केली आहे. तसंच या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन इंदरपाल सिंग यांनी केलं आहे. विक्रम गोखले, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, मिलिंद गुणाजी, दिवंगत अभिनेत्री रिमा लागू, संजय नार्वेकर यांसारखे मराठीमधील आघाडीचे कलाकार यामध्ये काम करताना दिसणार आहेत.