कदमांचा ‘उदासबोध’

सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या तर २८८ उमेदवार मिळवणे ते लढवणे आणि त्यात बहुमत मिळेल एवढे निवडून आणणे हे सोपे काम नाही. शिवसेनेकडे आता केवळ घटनेची प्रत शिल्लक राहिली आहे. घटनेच्या प्रती तयार करता येतील, मात्र कट्टर शिवसैनिक तयार करणे हे शिवसैनिकांच्या जीवाला जीव लावून काम केल्याशिवाय होणार नाही.

शिवसेनेला पडलेले खिंडार कमी आहे, म्हणून की काय मंगळवारी रामदास कदम या कट्टर शिवसैनिकाने शिवसेना वाचवण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांना उद्धव ठाकरे यांनी दूर केले पाहिजे, असे सांगत पवार कुटुंबीयांवरच हल्ला चढवला. हे करत असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शेजारी जमलेल्या त्यांच्या सल्लागारांनाही बाजूला ठेवण्याचे आवाहन केले आहे. अत्यंत भावनिक होत, त्यांनी हा सल्ला त्यांच्या भाषेत विनंती, उद्धव ठाकरे यांना केली. याचा परिणाम उद्धव ठाकरे यांच्यावर कितपत होईल, हे सांगता येत नसले तरी आता शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील, याच्या शक्यता अत्यंत धूसर आहेत. याला विविध कारणे आहेत.

त्यातले महत्त्वाचे कारण म्हणजे भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून जो डाव खेळला आहे, तो डाव ते आता असा सहजासहजी गमावणार नाहीत. शिवसेनेला आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेससह पवार कुटुंबीयांना आरोपीच्या पिंजर्‍यात नेऊन आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला फारशा जागा मिळणार नाहीत, किंबहुना जागांमध्ये घट होईल, अशी व्यूहरचना आतापासूनच आखली जात आहे. रामदास कदम यांनी जे मनोगत माध्यमांसमोर व्यक्त केले, त्यामध्ये अजित पवार यांना त्यांनी खलपुरुष म्हणून उभे केले आहे. या त्यांच्या अभिव्यक्तीमुळे शरद पवार यांना अजित पवारांकडे दिलेले विरोधी पक्षनेतेपदही कालांतराने काढून घ्यावे लागेल का? ते आता लगेचच काढता येणार नाही, याचे कारण राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांना मानणारा गट आहे.

अजित पवार यांना विरोधी पक्षनेतेपदापासून हटवले तर हा गट नाराज होऊन पक्षामध्ये बेदिली माजू शकते. साहजिकच आता हा फाटाफुटीचा प्रकार शरद पवार यांना नको असेल. त्यामुळे शरद पवार तातडीने अजित पवार यांच्याकडून विरोधी पक्षनेतेपदाचे अधिकार काढून घेणार नाहीत. पद काढून घेणार नाहीत. मात्र जनतेमध्ये जो समज रामदास कदम यांनी अजित पवार यांच्यासंदर्भात करून दिला आहे, तो पाहता तो समज पुसून काढणे फार सोपे राहिले नाही.

अजित पवार सकाळी आठ वाजता मंत्रालयात येऊन बसतात आणि कामाला सुरुवात करतात, हा कौतुकाचा भाग नक्कीच आहे. मात्र ते आपल्या राष्ट्रवादी पक्षाकरिता काम करतात, हे सांगून रामदास कदम यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांना संशयाच्या भोर्‍यात उभे केले. अर्थात अजित पवार हे अशा प्रचाराला डगमगणा नाहीत. त्यांनी केलेली विकासकामे आणि त्यांचा स्पष्टवक्तेपणा हा सर्वसामान्यांना ही माहिती आहे. त्यामुळे शरद पवार, अजित पवार यांच्यावर आरोप करणे म्हणजे या दोघांनाही डिवचून त्यांना पुन्हा एकदा बलवान करणे होय.

यात रामदास कदम यांनी शिवसेनेच्या भवितव्याबद्दल आणि सध्याच्या ढासळत्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. या चिंतेचा सूर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समजून घेतला पाहिजे. ख तर ४० आमदार आणि बारा खासदार त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देत असतील तर त्याचे कारणही समजून घ्यायला पाहिजे. राजकारणात लवचिकता हा सर्वात मोठा गुणधर्म असतो, ज्याला पद-प्रतिष्ठा याच्याशी अजिबात देणे-घेणे नसते. त्याने ताठर भूमिका घेतली तर चालू शकते. याचे अत्यंत ठळक उदाहरण उद्धव ठाकरे यांच्याच घरात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने आहे.

शिवसेनाप्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट या बिरुदावलीवरच ते अत्यंत समाधानी होते. राजकारण करण्यासाठी आणि मंत्रालयात कामे करण्यासाठी त्यांच्या जीवाला जीव देणारी अनेक मंडळी होती. आज जे ४० आमदार फुटले आहेत, त्यातल्या अनेकांनी केवळ बाळासाहेब ठाकरे या दोन शब्दांसाठी आपले प्राण पणाला लावले होते. त्याच्या अनेक घटना ही मंडळी सांगू शकतात. मात्र याच मंडळींना उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत ज्या चौकडीने पोहोचू दिले नाही, त्यांनी शिवसेनेसाठी काहीच केले नाही, असे लक्षात येते. आयत्या पिठावर घोट्या मारण्यात यांनी समाधान मानले. आजपर्यंत ठाक घराण्याने मंत्रिपद न स्वीकारण्याचा घेतलेला वसा सोडायला लावला आणि आज शिवसेनेच्या पदरात फार काही शिल्लक राहिले आहे, असे वाटत नाही.

पुढे सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या, तर २८८ उमेदवार मिळवणे ते लढवणे आणि त्यात बहुमत मिळेल एवढे निवडून आणणे हे सोपे काम नाही. शिवसेनेकडे आता केवळ घटनेची प्रत शिल्लक राहिली आहे. घटनेच्या प्रती तयार करता येतील, मात्र कट्टर शिवसैनिक तयार करणे हे शिवसैनिकांच्या जीवाला जीव लावून काम केल्याशिवाय होणार नाही. आदित्य ठाकरे, संजय राऊत ही मंडळी ज्या पद्धतीने गेलेल्या शिवसैनिकांच्यासंदर्भात वक्तव्य करत आहेत ते पाहता नव्याने शिवसैनिक तयार होऊन शिवसेनेकरिता काम करतील, असे नजीकच्या काळात तरी दिसत नाही. पन्नास वर्षे काम केलेल्या शिवसैनिकांची हकालपट्टी अगदी सहजासहजी होत असेल तर नव्याने शिवसैनिक तयार होणार नाहीत हे सत्य आहे. एक ख रामदास कदमांनी उद्वव ठाकरेंसमोर उदासबोधाचे वाचन केले.

Dnyaneshwar: