मुंबई | Ramdas Kadam Allegations On Uddhav Thackeray – शिंदे गटात सामील झालेले रामादास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतील मराठी नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. मला आणि माझ्या मुलाला संपवण्याचा कटही त्यांनी आखला होता असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. शरद पवारांच्या मांडीवर बसून पक्ष चालवणाऱ्यांना पक्षप्रमुख का म्हणायचं? अशी विचारणा देखील त्यांनी केली आहे. तसंच पालापोचाळा कोणाचा झाला आहे याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं असा सल्लाही त्यांनी टीव्ही 9 शी बोलताना दिला आहे.
“उद्धव ठाकरेंना मराठा समाजातील लोकांना मोठं होऊ द्यायचं नाही, त्यांना संपवायचं आहे असा मला संशय आहे. नारायण राणे, रामदास कदम, एकनाथ शिंदे कोणीही असो, मराठी नेतृत्वाला मोठं होऊ द्यायचं नाही अशी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे का? असा मला प्रश्न पडला आहे”, असं रामदास कदम म्हणाले.
उदय सामंत यांनी सांगितलं ते जास्त भयानक आहे. उद्धव ठाकरे रूग्णालयात असताना कदम कुटुंबाला संपवून टाकण्यासाठी सहा बैठका झाल्या. या बैठकीला सुभाष देसाई, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत, आदित्य ठाकरे उपस्थित होते. रुग्णालयात असतानाही आमच्याविरोधात कटकारस्थान करुन संपवायला निघाला असाल, तर तुम्ही आम्हाला नाही शिवसेनेला संपवत आहात,” असं देखील कदम म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “तुम्ही रामदास कदम, योगेश कदमला नाही तर कोकणातील शिवसेनेला संपवत आहात. योगेश कदमला पाडून राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा. मग तुमची आई कोण आहे, राष्ट्रवादी की शिवसेना?,” अशी विचारणाही रामदास कदम यांनी केली.