बालगंधर्व रंगमंदिरात अखेर औषध फवारणी

पुणे ः बालगंधर्व रंगमंदिरामध्ये नाट्यप्रयोगावेळी डासांची पैदास वाढल्याचे वृत्त दै. ‘राष्ट्रसंचार’मध्ये प्रकाशित होताच महापालिका प्रशासनाने औषध फवारणी आणि धूर फवारणी केली.

सांस्कृतिक केंद्र उपायुक्त सुखदेव वारुळे, प्रशासनाधिकारी सुनीता जगताप आणि साधना रेगे यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर कलादालनात औषध फवारणी करण्यात आली.

धूर फवारणी आज रात्री ८ वाजता करण्यात येणार आहे. नदी शेजारीच आहे. जलपर्णी मोठ्या प्रमाणात असल्याने डासांची संख्या वाढती आहे. सोबतच मेट्रोचे काम सुरू आहे. त्याचा राडारोडाही या ठिकाणी टाकला जात आहे. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिर परिसरात डास वाढले आहेत. रोज रात्री रसिक येण्यापूर्वी धूर फवारणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यादिवशी कोणतेही कार्यक्रम नाहीत. त्यामुळे औषध फवारणी आणि धूर फवारणी करण्यात येणार आहे.

बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्यातील नामवंत नाट्यगृह आहे. येथे सांस्कृतिक कार्यक्रम सातत्याने होत असतात. त्याची सार्वजनिक स्वच्छता राखणे पुणे महापालिकेचे काम आहे. काही महिन्यांपूर्वी मुक्ता बर्वे यांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील अस्वच्छतेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. पालिका जागरूक झाली होती. दरम्यान, पुणे महापालिकेच्या इतर नाट्यगृहांची अवस्था अत्यंत वाईट आहे.

Dnyaneshwar: