पुणे- Pune News | मागील तीन दिवसांपूर्वी अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या दैनिक ‘राष्ट्रसंचार’च्या (दि. १८ जून २०२२) पुणे सिटी अपडेट अंकात ‘‘वाहतूक पोलिसांची विनाकारण दंडवसुली’’ ही विशेष बातमी प्रकाशित झाली होती. अखेर या बातमीची पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दखल घेतली असून, संबंधित वाहतूक पोलिसांची (सोमवारी) कानउघडणी केली.
वाहतूक पोलिसांच्या चौकांमध्ये नियमन करण्याबाबत अनेक प्रतिक्रिया आहेत. मात्र प्रत्यक्षात काय स्थिती आहे, याची संबंधित चौकांमधील सीसीटीव्ही चित्रीकरण व अन्य पद्धतीने पाहणी केली जाईल,’’ असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सोमवारी स्पष्ट केले. दरम्यान, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी वाहतूक पोलिसांची कानउघडणी केली होती. वाहतूक पोलिसांच्या मनमानी कारभाराला पोलिस आयुक्तांनी चाप लावत दंडात्मक कारवाईपेक्षा वाहतूक नियमनावर भर देण्याचे आदेश दिले.
त्यामुळे वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमन करण्याची गरज होती. प्रत्यक्षात चौक, रस्त्यांवर वाहतूक पोलिसच दिसत नसल्याची नागरिकांच्या तक्रारी आहेत. यावर आता आयुक्तांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.