‘राऊतांचा अग्रलेख म्हणजे आंब्याच्या झाडाला…’- आशिष शेलार

मुंबई : भाजपा आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेदरम्यान आशिष शेलारांनी संजय राऊत यांचा राम मंदिर आंदोलन आणि बाबरी मशीद पाडण्याशी कोणताही संबंध नाही, असे परखड मांडले होते. यावर राऊत यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना, “माणसांना जे वापरण्यासाठी ठेवले जातात त्याला उपवस्त्र म्हणतात. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर हल्ला करण्यासाठी राजकारणात असे वापर सुरु आहेत. ज्यांची स्वत:ची हिंमत नाही असे बिनहिमतीचे लोक असे छोटे लोक, पक्ष पकडतात आणि आमच्यावर हल्ला करायला लावतात. आम्ही लढण्यासाठी सक्षम आहोत,” असं म्हटलं होतं. यावर आता आशिष शेलार यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिलं आहे.

यावेळी आशिष शेलार म्हणाले, “आजपर्यंत बाळासाहेब ठाकरेंकडे असलेला सन्मान, भावना आणि हिंदुत्वाची आवश्यकता होती, म्हणून आम्ही शिस्त पाळली. राऊतांसाठी शिस्त पाळणार नाही. संयमाची ऐशी की तैशी.”

“शिवसेना बाबरी मशिद आणि राम मंदिराच्या विषयात अदखल पात्र आहे हे सत्य आहे. कल्याण सिंह यांनी राम मंदिरासाठी स्वतःचे सरकार खाली पाडले. तुम्ही देव देश आणि धर्मासाठी पहिले मंदिर नंतर सरकार म्हणत पलटी मारलीत. बेडुकउड्या मारणाऱ्या शिवसेनेचे संजय राऊत नवे नेतृत्व आहे. आता पहिले मंदिर नंतर सरकार कुठे गेले? हिंमत असेल तर कल्याण सिंह यांच्यासारखे सरकारमधून बाहेर पडा. शिवसेनेचा आजचा कार्यक्रम हा आयत्या बिळावर नागोबासारखा आहे. कुठेही काही झाले तर आमच्यामुळे झाल्याचे म्हणतात,” असंही शेलार म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “मनसे भाजपाचे उपवस्त्र असल्याचे म्हणत असाल तर मग शिवसेनेला तुमची फाटकी बनियान आहे का असे म्हणायचे का? हिंदुत्वावरुन तुम्ही फारकत घेतली, मुंबईच्या भ्रष्टाचाराने तुमची फाटली, मशिदिवरील भोंगे उतरवताना तुमची फाटली त्यामुळे शिवसेना फाटकी बनियान आहे असे म्हणायचे का?”, असा सवाल देखील आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

“कायदा सुव्यवस्था कशी राखावी, गुंडाचा बिमोड कसा करावा आणि अनधिकृत भोंगे कसे उतरवावते यासाठी योगी ट्युशन क्लासेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासह सर्व मंत्र्यांनी लावावेत. संजय राऊतांनी चीन मधल्या भोंग्याचे सोडून चिराबाजारबद्दल बोलावे. मुळात राऊतांचा अग्रलेख म्हणजे आंब्याच्या झाडाला काकडी किती लागली विचारण्यासारखे आहे. कबड्डीच्या खेळामुळे हॉकीचे गोल विचारण्यासारखे आहे. चर्चा मशिदीवरुन सुरु आहे तर चीनकडे कुठे जाता,” असंही शेलार म्हणाले.

Sumitra nalawade: