पवारांसोबतच्या बैठकीनंतर राऊतांचं एकनाथ शिंदेंना जाहीर आव्हान; म्हणाले…

मुंबई : कालच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना माघारी मुंबईत येण्यासाठी २४ तास दिले होते. आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहोत तुम्ही मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलावं नक्कीच तुमच्या मागण्यांचा विचार केला जाईल. असं राऊत म्हणाले होते. त्यानंतर आज काही वेळेपूर्वीच मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा एकनाथ शिंदेंना आव्हान केलं आहे.

राऊत म्हणाले की, २४ तासाचा तुम्हाला वेळ दिला होता. परंतु आता वेळ निघून गेली आहे. जर रस्त्यावर लढाई झाली तर तिथेही आम्हीच जिंकू. आम्ही फक्त कायद्याचे मार्ग वापरणार नाही तर सर्वच मार्ग वापरू. यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या साक्षीनं आम्ही हार मानणार नाही. ज्यांना आमचा सामना करायचा आहे ते मुंबईत येऊ शकतात. “तुम्ही या, आमची पूर्ण तयारी आहे हे आमचं आव्हान आहे,” असं राऊतांनी एकनाथ शिंदेंना आव्हान केलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिलीप वळसे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यानंतर आता महाविकास आघडी हार न मानता पुन्हा लढणार आहे. त्यांना आम्ही परत येण्याची संधी दिली होती. परंतु आता अल्टिमेटमचा वेळ संपला आहे. तसंच ज्या इमारतीमधून महाविकास आघाडीची सुरुवात झाली याच इमारतीमधून मी तुम्हाला महाविकास आघाडी मजबूत असल्याचं सांगतोय आणि पुढील अडीच वर्ष पूर्ण करुन पुन्हा सत्तेत येईल असं देखील राऊतांनी म्हटलं आहे.

Nilam: