पोलीस आयुक्तांनी नवनीत राणांचा व्हिडीओ ट्विट केल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबई : नवनीत राणा यांना प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी खार पोलिसांनी अटक केली आहे. तसंच त्यांनी खार पोलिसांवर अनुसूचित जातीची असल्याने भेदभाव करणारी वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात नवनीत राणा यांनी थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं असून त्यांनीदेखील याची दखल घेत २४ तासात सविस्तर माहिती देण्यास सांगितलं आहे. यादरम्यान मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणा दाम्पत्याचा पोलीस ठाण्यातील एक व्हिडीओ ट्वीट करत आरोप करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. यासंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले, मागील काही दिवसांपासून मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे. राणा दाम्पत्याने मुंबई पोलिसांवर खोटे आरोप लावलेत. त्याशिवाय, राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषवलेले आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्यांनी मुंबई पोलीस दलावर खोटे आरोप लावणे चुकीचे आहे. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी बिनबुड्याच्या आरोपांना पुराव्यासकट उत्तर दिले असून देशाने संजय पांडेंचे आभार मानले पाहिजे. राणा यांच्याशी मुंबई पोलीस सौजन्याने वागले असल्याचं दिसून आल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

पोलीस आयुक्तांच्या ट्वीटनंतर जातीच्या आधारे भेदभाव केल्याचा आरोप खोटा असल्याचं समोर आलं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच राणा यांचं जात प्रमाणपत्र खोटं असून त्यांच्या जात प्रमाणपत्राची चौकशी करावी अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. दरम्यान, आपण कोणालाही जीवे मारण्याची धमकी दिली नसल्याचं राऊत यांनी सांगितलं आहे. दरम्यान, राणा दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राऊत यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

Sumitra nalawade: