मुंबई | Ravi Rana On Cabinet Expansion – जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार 9 ऑगस्ट या दिवशी पार पडला. यावेळी एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे काही अपक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये अपक्ष आमदार रवी राणा हे मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असल्याचं पहायला मिळालं. परंतु देवेंद्र फडणवीस अमरावतीमधून योग्य व्यक्तीची निवड करतील, असा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला आहे.
“उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे ऑनलाइन सरकार चालवलं. मात्र आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने मजबूत सरकार आले आहे. मी कधीही मंत्रिपद मागितलं नाही आणि मी नाराजही नाही. कुठल्याही अपक्ष आमदाराने नाराज व्हायची गरज नाही. देवेंद्र फडणवीस यांना अमरावती जिल्ह्याची जाण आहे. ते योग्य वेळी योग्य व्यक्तीची निवड अमरावतीमधून मंत्री आणि पालकमंत्री म्हणून करतील. अमरावती जिल्ह्याला कोण योग्य न्याय देऊ शकतो याची फडणवीस यांना चांगली कल्पना आहे, ते योग्य व्यक्तीची लवकरच निवड करतील, असं रवी राणा म्हणाले.
दरम्यान, राज्यातील रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. राजभवनातील दरबार हाॅलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.