नागपूर | Ravi Rana – अमरावती येथील औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणात (Umesh Kolhe Murder Case) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची चौकशी व्हावी अशी मागणी आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी पोलिसांना चोरीच्या बाजूने तपास करा असा आदेश दिला होता, असा आरोपही रवी राणांनी केला आहे. यानंतर मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी राज्य गुप्तचर विभागाचा अहवाल आल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल अशी माहिती विधानसभेत दिली आहे.
“उद्धव ठाकरे यांनी एका काँग्रेस नेत्याच्या सांगण्यावरुन हा तपास चोरीच्या दिशेनं करण्यास सांगितलं होतं. खासदार नवनीत राणा आणि मीदेखील गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे गेलो होतो. राज्याचे मुख्यमंत्री प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचं आम्ही सांगितलं होतं. तसंच त्यांनी एनआयएकडे तपास सोपवला होता. दिल्लीवरुन एनआयएचं पथक आलं तेव्हा नुपूर शर्माच्या समर्थनार्थ हिंदुत्वाच्या बाजूनं पोस्ट केल्यानं भरचौकात त्यांची हत्या केल्याचं स्पष्ट झालं होतं,” असं रवी राणा यांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी हे प्रकरण दाबण्याचं काम केलं आहे. याची एसआयटीच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे. तसंच उद्धव ठाकरेंनी पोलीस आयुक्तांना केलेल्या फोनचीही चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणीही रवी राणा यांनी केली आहे.
“रवी राणा यांच्याकडून उमेश कोल्हे प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली जाईल. तेथील पोलीस आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर त्यांचा आक्षेप आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल राज्य गुप्तचर विभागाकडून 15 दिवसांच्या आत मागवला जाईल. गृहमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे हा अहवाल सोपवला जाईल. अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल,” असं आश्वासन शंभूराज देसाई यांनी दिलं आहे.