मुंबई | Ravi Rana – शिंदे-फडणवीस सरकार समर्थक दोन अपक्ष आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले होते. बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणी (Ravi Rana) आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी शिंदे-फडणवीसांना मध्यस्थी करावी लागली. मुंबईत झालेल्या या बैठकीनंतर रवी राणा यांनी दिलगीरी व्यक्त केली. त्यानंतर बच्चू कडू यांनी सोमवारी रात्री कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि आपली भूमिका जाहीर करण्यासाठी आज (1 नोव्हेंबर) अमरावती येथे मेळाव्याचं आयोजन केलं होतं. त्यावेळी दोघांकडून हा वाद संपल्याचं कडू आणि राणा यांनी व्यक्त केलं. तसंच यासंदर्भात आता रवी राणांनी माध्यामांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी रवी राणा म्हणाले, आता शेतकरी, सर्वसामान्य यांचे प्रश्न, बेरोजगारी संबंधी प्रश्न ते पुढे आणायचे आहेत. म्हणून आता हा वाद विवाद राहिला नाही संपला आहे. आता कोणताही वाद नाही आम्ही लोकांसाठी काम करत राहणार. बच्चू कडू आणि माझ्यातला वाद आता संपला आहे, अशी प्रतिक्रिया राणांनी दिली आहे.
दरम्यान, आज बच्चू कडू यांनी मेळावा घेवून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. ते म्हणाले सत्ता गेली चुलीत. मी कधीच राजकारणासाठी दिव्यांगांचा वापर केला नाही. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही, आमच्या वाटेला आलेल्यांचा कोथळा बाहेर काढतो. ही पहिली वेळ आहे. त्यामुळे आम्ही माफ करतो. पण आमच्या वाट्याला पुन्हा गेलात तर सोडणार नाही असा इशारा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांना दिला आहे.
रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वाकयुद्धानंतर बच्चू कडू यांनी आज अमरावतीत पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या मेळाव्याला बच्चू कडू यांनी संबोधित करताना राणा यांच्यासोबतच्या वादावर पडदा टाकत असल्याचे संकेत दिले. ते शायरीतून म्हणाले, ‘जली को आग कहते है, बुझी को राख कहते है’ म्हणत विरोधकांना आव्हान देत बच्चू कडू यांच्या प्रहार मेळाव्यात जोरदार हल्ले चढवले. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले, प्रहार हा आंडूपांडूंचा पक्ष नसून लढवय्यांचा पक्ष आहे. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही जर कोणी वार केला तर प्रहार केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.