रवी राणांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर गंभीर आरोप; म्हणाले, “भाजपाला मतदान करु नये म्हणून…”

अमरावती | Ravi Rana On CM Uddhav Thackeray – आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्यापासून रोखण्यासाठी महाविकास आघाडीने दबाव तंत्राचा वापर सुरू केला आहे. मी भाजपाला मतदान करू नये, म्हणून महाविकास आघाडीने मला अटक करण्यासाठी मुंबई आणि अमरावती पोलिसांना माझ्या मुंबईतील घरी पाठवले आहे, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. राणा यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून प्रसारित केलेल्या व्हिडीओतून हा आरोप केला आहे.

रवी राणा यांनी म्हटलं आहे की, राजापेठ येथील उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्यानंतर महापालिका आयुक्तांवर शाईफेक करण्यात आली होती. याप्रकरणी आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती आणि मुंबई पोलिसांचे एक पथक मला अटक करण्यासाठी मुंबईतील खार येथील निवासस्थानी पोहोचले, पण आपण त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने ते मला अटक करू शकले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावतंत्राचा हा एक भाग असून आपण यावर कायदेशीर पद्धतीने उत्तर देणार आहोत.”

दरम्यान, आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. हा वॉरंट आमदार राणा यांना देण्यासाठी राजापेठ पोलीस शनिवारी रवी राणा यांच्या मुंबईतील घरी पोहचले होते. मात्र राणा दाम्पत्य सध्या राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत.

Sumitra nalawade: