‘फील देअर पेन’ची राष्ट्रस्तरीय मोहीम
पुणे : विविध उद्योगांच्यानिमित्ताने मुक्या प्राण्यांवर होणारे अत्याचार, त्यांचे होणारे शोषण आणि त्यांची होणारी कत्तल या सगळ्याविरोधात व्हेेगन इंडिया मुव्हमेंटने राष्ट्रीय पातळीवर जाणू या त्यांची वेदना अर्थात ‘फील देअर पेन’ ही राष्ट्रस्तरावरील मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील वेस्ट साईडसमोर निषेध सभा आयोजिण्यात आली होती. या निषेध सभेत संपूर्ण देशातील व्हेगन कार्यकर्ते सहभागी झाले होते.
प्राण्यांपासून मिळणारे खाद्यान्न आणि इतर वस्तूंच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर प्राण्यांवर अत्याचार केले जातात. या प्राण्यांच्या वेदना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विविध उद्योगांमुळे प्राण्यांवर होणार्या अत्याचारांना वाचा फोडण्यात येऊन या अत्याचाराचा निषेध करण्यात आला. यावेळी व्हेेगन इंडिया मुव्हमेंटच्या स्वयंसेवकांनी या मोहिमेचा एक भाग म्हणून, बंदिस्त पिंजर्यात आणि दाटीवाटीने क्रेटमध्ये राहणार्या प्राण्यांना नेमके काय वाटत असेल, याचा अनुभव घेण्यासाठी लोकांना पिंजर्यात बसण्यास आणि क्रेटवर जास्तीत जास्त वेळ उभे राहण्यास सांगितले. वेगवेगळ्या उद्योगांमध्ये प्राण्यांवर होणारे अत्याचार, क्रूरपणे केली जाणारी त्यांची कत्तल आणि त्यांचे शोषण याविषयी जागृती करणारे फलक आणि शाकाहाराचे महत्त्व सांगणार्या घोषणांनी हा परिसर गजबजून गेला होता.
खरेतर जुनी परंपरा, प्रथा इ. गोष्टी खर्या असल्या तरी असल्या प्रथेत मुक्या प्राण्यांचा छळ होतोय. प्राण्यांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायद्याप्रमाणे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काही नियम व अटींबाबत देखरेख करणारी समिती स्थापन करणे आवश्यक असताना राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे की काय, अशी शंका निर्माण होत आहे.