मुंबई | Eknath Shinde’s First Tweet After Uddhav Thackeray’s Resignation – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 35 हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरेंनी बुधवारी रात्री राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्त केला. तसंच ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदेंनी ट्विटद्वारे पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर शिंदे गट भाजपसोबत जाणार अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असं शिंदे यांनी ट्विट करत स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, “वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस,” असं देखील शिंदेंनी दुसऱ्या ट्विटद्वारे म्हटलं आहे.