पंढरपूर : आठ वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर मोहोळ चे माजी आमदार रमेश कदम हे आता पुन्हा एकदा राजकारण समाजकारणामध्ये सक्रिय होत आहेत. एक महिनाभराची विश्रांती घेऊन काल ते पंढरपूर मध्ये आले आणि पंढरपूर तालुक्यातील मोहोळ मतदार संघाच्या 17 गावांचा त्यांनी दौरा केला. यापुढे आपण समाजकारणामध्ये सक्रिय होणार असून लोकांचे कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले असले तरी , या संपूर्ण दौरा – गर्दीची जमवाजमव – लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या ऐकण्याचा सपाटा -पत्रकार परिषद या सगळ्या पाठीमागे आगामी विधानसभेच्या उमेदवारीचे गणित आहे हे स्पष्ट आहे.
आठ वर्षांपूर्वी रमेश कदम नावाचा झंझावात या जिल्ह्याने अनुभवला आहे. जिल्ह्यानेच नव्हे तर राज्याभरामध्ये त्यांची चर्चा झाली होती. लोकसेवा चौकामध्ये उभा राहून खादीतील पोलिसांना अरे – तुरे करणारे रमेश कदम ते थेट अधिकारी, लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते यांना शिंगावर घेत आपल्या आक्रमक शैलीचा वकूब दाखविणारे कदम सर्वांनी पाहिले आहेत. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या ताकदीमुळे मातब्बर बनलेल्या लक्ष्मण ढोबळे यांना थेट भिडणारे रमेश कदम हे अनेक तरुणांचा ताईत बनले होते. परंतु त्याहीपेक्षा प्रचंड पैशाची उधळण मागेल त्याला पदे – निधीची प्रकरणे या त्यांच्या कार्यशैलीमुळे केवळ मातंग समाजाचे नव्हे तर अनेक जाती-जमातीचे कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे आले होते.
राजन पाटील यांच्यापासून दुखावलेला एक पारंपारिक वर्ग मोहोळ मतदार संघामध्ये आहेच, परंपरागत राजकारणाला कंटाळलेल्या लोकांचा हा वर्ग आणि त्यासोबतच लक्ष्मण ढोबळे यांच्याही नेतृत्वाकडून भ्रमनिरास झालेला एक वर्ग त्यावेळी रमेश कदम यांच्या पाठीमागे आला . ग्राउंड रियालिटी ओळखून अजित पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली, ते निवडून आले परंतु तेव्हापासून त्यांचा आत्मविश्वास हा शेफांरलेपणामध्ये परिवर्तित झाला. मग त्यांनी थेट लक्ष्मण ढोबळे यांच्या सूतगिरणीत हात घालण्याचा प्रयत्न केला, पण तेथे तो फसला. पारंपारिक राजकारणी ज्याप्रमाणे सत्ता आणि संपत्तीचे केंद्रीकरण करतो आणि कार्यकर्त्यांना खुश करतो हे सर्व त्यांनी केले. परंतु या सगळ्यांमध्ये एक आक्रमकपणा असल्यामुळे त्यांच्या कार्यशैलीची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली.
परंतु या काळामध्ये जनतेची कामे होत होती, हे नाकारून चालणार नाही. सर्वसामान्य लोकांना पैसे मिळत होते. कर्ज मिळत होते. त्यांच्या शब्दाला एक प्रकारे प्रशासनामध्ये मान मिळत होता आणि त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला. त्यामुळे त्यांचे नेतृत्व ठसत गेले. परंपरागत राजकारण्यांना हेच पटत नव्हते. ढोबळे यांच्यासारखी शक्ती देखील त्यांचा काटा काढण्यासाठी टपून बसली होती. या सगळ्याचे पर्यवसन अखेर एका गुन्ह्यांमध्ये झाले.
या जिल्ह्यातील अन्य राजकारणी करतात तेच त्यांनी केले. फार वेगळे केले नाही. परंतु त्यांच्यावर लक्ष ठेवून त्या प्रकरणांमध्ये गुंतवून त्यांना राजकारणातून उठवण्याचे षडयंत्र रचले गेले आणि ते यशस्वी झाले. एका मर्यादेनंतर अजित पवार देखील त्यांना कंटाळले. एका प्रकरणात दहा कोटीची रक्कम मागितल्याची तक्रार अजित दादांकडे गेली. त्यावेळी अजित दादांनी त्यांची समोरासमोर झाडाझडती घेतली. ‘ मला राष्ट्रवादी भवन बांधायचे म्हणून ….. ‘ असा खुलासा त्यांनी दिला, परंतु त्यावर दादा नाखुश होते. शेवटी त्यांनीही हात आखडला घेता आणि रमेश कदम उघड्यावर पडले.
रमेश कदम नावाचे पर्व संपले हे आता जवळपास निश्चित होते. परंतु काल त्यांनी पुन्हा एकदा सुरू केलेला झंजावात पाहता, हे वादळ शमलेले नाही हेच दिसून आले. त्यांच्या पाठीमागे केवळ मातंग समाजाची शक्ती नाही. केवळ त्या एका समाजाच्या बळावरती रमेश कदम एवढे मोठे धाडस करू शकत नाहीत. राजकारणात सक्रिय होण्याकरता उमेदवारी पासून ते विजयापर्यंत जरूर त्यांच्या मागे जातीचे कार्ड आहे परंतु पुढे चालण्यासाठी केवळ त्यावरती विसंबून ते राहत नाहीत, तर या निमित्ताने त्यांनी बहुजन समाज एकत्रित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. येथील अन्यायग्रस्त जनतेला आणि आशा – निराशेच्या गर्दीत अडकल्या तरुणांना पुन्हा एकदा साथ देण्याचा प्रयत्न केला आहे. पाठीमागे जी घमेंडखोर भाषा आणि जी मस्ती त्यांनी केली ती यावेळी होणार नाही हे त्याने स्पष्टपणे सांगून आपल्या परिपक्वपणाचा प्रत्यय दिला आहे .
आठ वर्षानंतर राजकारण देखील बरेच बदलले आहे. सध्या कुठल्याही पक्षावर – नेत्यावर लोकांचा विश्वास नाही. रस्त्यावरती उभा राहून काम करणाऱ्या वरती आता नागरिकांचा विश्वास आहे. अशा मळभलेल्या आणि अशा – अपेक्षा परिवर्तित झालेल्या एका वेगळ्या पर्वा मध्ये रमेश कदम सारखा माणूस पुन्हा उभा ठाकला आहे. यामुळे मोहोळ तालुक्याच्या राजकारणाला निश्चितपणाने कलाटणी मिळणार आहे.
राजन पाटील आणि त्यांचे युवराज आपली पठडी बदलायला तयार नाहीत. उमेश पाटील यांनी स्वतःचेच नव्हे तर त्या अजित पवार च्या प्रतिमेचे आणि राष्ट्रवादीचे वाटोळे करून ठेवले आहे. एक संघटक म्हणण्यापेक्षा एक मध्यस्थ म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ते लोकनेते होऊ शकत नाहीत. शिवसेना खचली आहे. यशवंत माने प्रभावहीन ठरले आहेत. अशा कालावधीमध्ये रमेश कदम यांच्यासारख्या नेत्याची एन्ट्री तालुक्याची हवा बदलू शकते. परंतु आता त्यांच्या पाठीमागे उभा असणारा पक्ष , त्यांच्याकडे असणारा पैसा, तो पैसा वापरण्याचे नियोजन करणारी यंत्रणा… या सगळ्या वर पुढची वाटचाल अवलंबून आहे. पण त्यांच्या अस्तित्वाची पुनर्प्रतिष्ठेची सुरुवात मात्र अत्यंत योग्य पद्धतीने झाली आहे हे मान्यच करावे लागेल.