पुणे : महाराष्ट्र व गोवा वकील परिषद, तसेच पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम महाराष्ट्रातील एकदिवसीय प्रादेशिक वकील परिषद व कार्यशाळा पार पडली.
परिषदेत दस्तनोंदणी कौशल्यपूर्ण विकास हा मुख्य विषय होता. परिषदेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले. परिषदेसाठी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, तसेच महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे उपस्थित होते. या परिषदेसाठी वकीलवर्गाने मिळकतीचे हस्तांतर करताना घ्यावयाची काळजी या अनुषंगाने चर्चासत्र ठेवण्यात आले होते. परिषदेचे संयोजक ॲड. राजेंद्र उमाप यांनी पुणे विभागात मिळकतीची हस्तांतरसंबंधित कामे करणारे अनेक वकील असून, त्यांनी या चर्चासत्रामधील माहितीचा उपयोग करून उच्च दर्जाची वकिली करावी, असे आवाहन केले.
“मिळकतीचे हस्तांतर करताना वकिलाचा सहभाग हा महत्त्वपूर्ण असून, सर्व कायदे व तांत्रिक पूर्तता याचे परिपूर्ण ज्ञान स्वतः जवळ ठेवणे ही काळाची गरज आहे”.
_भूषण गवई, न्यायमूर्ती
महाराष्ट्र वकील परिषदेचे राष्ट्रीय सदस्य ॲड. जयंत जायभावे यांनी मिळकतीचे काम करताना वकील वर्गाकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या. तसेच परिषदेमध्ये दस्तनोंदणी क्षेत्रातील पस्तीस वर्षांहून अधिक प्रॅक्टिस असलेल्या ११ ज्येष्ठ वकिलांचा सत्कार आयोजित केल्याबद्दल ॲड. राजेंद्र उमाप, हर्षद निंबाळकर, ॲड. पठाण व पुणे वकील संघाचे अध्यक्ष थोरवे यांचे अभिनंदन केले.
पुणे वकील संघाच्या वतीने रुग्णवाहिका देण्यात आली. पहिल्या सत्रात मिळकतीच्या हस्तांतरणासाठी लागणाऱ्या परवानग्या व संबंधित कायदे यावर चर्चा झाली. विविध कायद्यांच्या वर्तमान परिस्थितीनुसार आवश्यक परवानग्या व त्यामागची कायदेशीर पार्श्वभूमी यावर सखोल चर्चा झाली. परिषदेच्या दुसऱ्या सत्रात पुणे येथील ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत कानेटकर यांनी टायटल तपासणी व त्यातील कायदेशीर पूर्तता या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांनी टायटल करताना वकील वर्गावर होणाऱ्या फौजदारी कारवाई या संबंधी चर्चा केली. तिसऱ्या सत्रात पुणे जिल्हा न्यायालयाचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी तरुण वकिलांना यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले.