मुंबई | Ramdas Kadam’s Big Statement – शिवेसनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी नुकतीच एक खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 1995 ला शिवसेना-भाजप युतीची राज्यात सत्ता आल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात असतानाही मला मंत्रीपद मिळालं नाही. फक्त मी राज ठाकरे यांच्यासोबत होतो म्हणून मला मंत्रीपद मिळालं नसल्याचं रामदास कदम म्हणाले. तसंच रामदास तुझ्यामुळं माझ्या घरात भांडणे चालली असल्याचं बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले होते. एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर रामदास कदम आले होते. यावेळी त्यांनी आपला शिवसेनेतील प्रवास आणि सध्या सुरु असलेल्या राजकीय स्थितीवर देखील भाष्य केलं.
यावेळी रामदास कदम म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी सांगते की, अनिल परब यांच्याविरोधात मी काही केलं नाही. त्यांनी मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांचे नातू आहेत. उद्धव ठाकरेंचे पुत्र आहेत. त्यांचा आदेश मान्य करणे आम्हाला भाग पडत होते. मी मंत्री असतानाआदित्य ठाकरे मला अधिकाऱ्यांच्या बैठका लावायला सांगत होते. मागील तीन वर्षापूर्वी मला मीडियासमोर येऊ नको म्हणून सांगितले. मीडियाशी बोलू नको असं सांगण्यात आलं. तरीपण मी गप्प बसलो. या तीन वर्षात मी फक्त एकच पत्रकार परिषद घेतली, असा खुलासा रामदास कदम यांनी केला आहे.
एवढ झालं तरी तुम्ही गद्दारचं म्हणणार का? असा सवालही रामदास कदम यांनी उपस्थित केला. बाळासाहेबांच्या विचारांशी कोणी गद्दरी केली याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? असंही ते म्हणाले. कालपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सर्वांनी एकत्र यावं अशी माझी इच्छा होती. मात्र, आता माझी भूमिका बदलली असल्याचं रामदास कदम म्हणाले. आम्हाला शिवसेना वाचवायची आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेससोबत जायचं नसल्याचं देखील कदम म्हणाले.