राष्ट्रीय महिला आयोगातर्फे जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती घुमटात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांसाठी तीन दिवसीय नेतृत्व विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि मानवाधिकार, लोकशाही, शांतता आणि सहिष्णूतासाठीचे युनेस्को सहकार्याने होत आहे.
पुणे ः भारत तेव्हाच विश्वगुरू बनेल जेव्हा देशाची अर्धी लोकसंख्या असलेल्या स्त्रियांना आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक पाऊल पुढे टाकून सर्व स्त्रियांनी जोमाने कार्य करावे, असे आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केले.
राष्ट्रीय महिला आयोगातर्फे राजबाग लोणी काळभोर येथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती घुमटात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांसाठी तीन दिवसीय नेतृत्व विकास परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. या वेळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सन्मानीय पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ कराड होते. एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल कराड आणि कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस उपस्थित होते.
रेखा शर्मा म्हणाल्या, महिलांना मागे ठेऊन कोणताही समाज प्रगती करुच शकत नाही. या आयोगाद्वारे स्त्रियांना सक्षम करण्यावर अधिक भर दिला जाता आहे. अन्याय, अत्याचाराच्या बेड्या तोडून स्त्रिया सर्वच क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करण्यास धडपडतांना दिसतात. आता त्यांच्यातील नेतृत्व गुणांवर भर देऊन कार्य केले जात आहे. तसेच आर्थिक आणि राजकियदृष्या सक्षमीकरणावर काम करावयाचे आहे.
विजया रहाटकर म्हणाल्या, सुरक्षा, आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण या चार स्तंभावर महिलांना खंबीर करण्याचे कार्य आयोगाद्वारे केले जावे. पंतप्रधानांनी महिलांसाठी जनधन योजना, सुकन्या योजना आणि बेटी बचाओ बेटी पढाओ सारख्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजना, ट्रिपल तलाकचा कायदा आणि २ कोटी पेक्षा अधिक मुस्लिम बालिकांना या देशात स्कॉलरशीप दिली जात आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुद्रा योजना आणाली त्यातून १८ कोटी महिला सक्षम झाल्या. कायद्यात बदल करून १२ वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणार्र्यास फाशीची शिक्षा दिली जावी.
रूपाली चाकणकर म्हणाल्या, स्त्रियांच्या सुरक्षेबरोबरच आत्मविश्वास वृद्धिंगत करून एकजुटीने कार्य करणे त्यांना शिकविणे, समर्थन देणे, स्त्रियांच्या प्रगतीसाठी नवनवीन योजना राबविल्या जातात. गर्भापासून ते मृत्यूपर्यंत महिलांचा जो प्रवास आहे त्यात तिचे बलिदान खूप मोठे आहे.