प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा त्यांच्यावर देशभरात अनेक ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या वक्तव्याने समाजातील काही लोकांच्या भावना दुखावल्या असल्यामुळे देशात हिंसक घटना घडल्या घडल्या असल्याचं निरीक्षणही सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे.
दरम्यान, नुपूर शर्मा यांच्यावर देशभरात अनेक ठिकाणी केसेस दाखल करण्यात आलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी सुप्रीम कोर्टात देशातील सर्व एफआयआर दिल्लीत एकत्रित आणून त्यावर सुनावणी करण्यात यावी अशी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने तशी मान्यता देण्यास नकार दिला होता. मात्र, सोमवारी (१८ जुलै) शर्मा यांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.
दिल्ली, महाराष्ट्र, तेलंगणा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि आसाम मध्ये शर्मा यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलेल्या आहेत. नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या येत असल्याने देशातील अनेक ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या केसेसमध्ये अटकेपासून दिलासा मिळावा यासाठी आणि सर्व केसेस दिल्लीत एकत्रित करून त्यावर सुनावणी करावी यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने शर्मा यांच्या याचिकेवर दिल्ली, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांन नोटिसा बजावल्या आहेत आणि अंतरिम उपाय म्हणून शर्मा यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. न्यायालय या प्रकरणाची पुढील सुनावणी १० ऑगस्ट रोजी करणार आहे. तोपर्यंत महाराष्ट्रासह नोटीसा बजावलेल्या कोणत्याही राज्यात या प्रकरणात शर्मा यांना अटक होणार नाही.