मुंबई – Religious Conversion – Maharashtra Monsoon Session : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजप आमदार नितेश राणे यांनी धर्मपरिवर्तनाचा मुद्दा उपस्थित केला. श्रीरामपुरमधील अल्पवयीन मुलीचे धर्मपरिवर्तन करून तिच्यावर तीन वर्षे अत्याचार करण्यात आले यावरून नितेश राणे यांनी सरकारला धर्मांतर कायदा लागू करण्याची विनंती केली. त्याचवेळी राणे यांनी हिंदू धर्मातील मुलींचे धर्मपरिवर्तन करण्यासाठी तरुणांना आर्थिक पाठबळ पुरवले जात असल्याचा गंभीर आरोप देखील केला. धर्मपरीवर्तनासाठी असलेले रेट कार्ड देखील त्यांनी विधिमंडळात दाखवले.
नितेश राणे यांच्या या खुलाशानंतर राज्यात धर्मपरिवर्तनाचा मुद्दा उचलून धरण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील लोकांकडून त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दरम्यान, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. त्यांनी अलिगढ आणि आग्रातील झालेल्या धर्मपरिवर्तनाचा दाखला देत आरएसएस आणि भाजपचे लोक जबरदस्तीने लोकांच धर्मपरिवर्तन करत असल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर लव्ह जिहाद नावाची कसलीही संघटना अस्तित्वात नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
“हिंदू धर्म प्रेम शिकवतो, मात्र, काही लोक धर्माच्या नावावर द्वेशाचं विष पसरवत आहेत. ते हिंदू धर्मासाठी कलंक आहेत. बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान सर्व नागरिकांना १८ वर्षाच्या नंतर धर्म निवडण्याचा अधिकार देते. मात्र, सध्या हिंदुत्वाच्या नावावर देशातील ३० लोक भारताचं संविधान बदलू पाहत आहेत. लोकांनी जागृत झालं पाहिजे आणि संविधानाचं रक्षण केलं पाहिजे. अन्यथा भारताची अवस्था देखील श्रीलंकेसारखी होईल.” अशी भीती अबू आझमी यांनी व्यक्त केली आहे.