पुण्यात राजकीय आखाड्याचा देखावा, राज्यातील प्रमुख नेत्यांची साकारली हुबेहुब प्रतिकृती

पुणे | Pune News – पुण्यात गणेशोत्सवाची (Pune Ganeshotsav) तयारी जोरात सुरु असल्याचे दिसत आहे. अशातच देखावे आणि देशातील वेगवेगळ्या मंदिरांची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणी हलत्या देखाव्यांवर आणि बाकी देखाव्यांवर अखेरचा हात फिरवला जात आहे. त्यातच राज्यातील सरकारमधील काही नेते यंदा पुण्यातील देखाव्यामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे राजकीय आखाड्याचा देखावा पुण्यात दिसणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. राजकीय घडामोडी आणि संघर्ष या देखाव्यांमधून दाखवण्यात येणार आहे. पुण्यातदेखील पुण्याचे प्रसिद्ध कलाकार सतीश तारु (Satish Taru) यांच्या स्टुडियोत हा देखावा तयार केला जात आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहेत.

गतवर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाचा देखावा साकारण्यात आला होता. यंदा अजित पवारांच्या बंडाचा देखावा साकारण्यात येणार का? हे पाहावे लागणार आहे. कारण तारुंच्या या स्टुडिओत राज्यातील प्रमुख नेत्यांच्या हुबेहुब प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. या प्रतिकृतींचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

दरवर्षी देखाव्यांवरुन पुण्यातील गणेश मंडळांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळते. नवे आणि आकर्षित करणाऱ्या देखाव्याकडे गणेश मंडळांचा कल असतो. त्यात सध्या सुरु असलेल्या विविध घडामोडींवर देखावा साकारण्यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. यंदा कोणता देखावा साकारावा, यासाठी अनेक महिन्यापासून गणेश मंडळाची जोरदार तयारी सुरु असते. अफझल खानाचा वध, शिवरायांचा प्रताप, शिवराज्याभिषेक सोहळा यांसारखे देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेतात. मात्र यावर्षी सत्तासंघर्षाचा देखावा लक्ष वेधून घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र यामुळे कोणताही राजकीय वाद सुरु होणार का, असा प्रश्नदेखील अनेकांना पडला आहे. मात्र या देखाव्यात नेमके गुवाहाटीचे बंड असणार की अजून काही हे पाहने महत्वाचे असणार आहे.

Sumitra nalawade: