पारदर्शक सेवा देऊन शासनाची प्रतिमा उंचवा

महसूल दिनविशेष : उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव

पुणे : महसूल विभागाने नेहमीच उत्कृष्ट कामगिरी बजावली असून, नागरिकांना पारदर्शक पद्धतीने, तत्परतेने आणि कालबद्धरीतीने सेवा उपलब्ध करून शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सदैव प्रयत्नशील राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व महसूल दिनाच्या निमित्ताने आयोजित उत्कृष्ट महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या गुणगौरव समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हाधिकारी संजय तेली, दादासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, महसूल विभाग राज्य शासनाच्या प्रत्येक विभागाचे प्रतिनिधित्व करणारा विभाग आहे. कोरोनाच्या काळात महसूल विभागाने अहोरात्र काम करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी रेमडेसिव्हीर औषधाचा पुरवठा, अन्नधान्य वितरण, ऑक्सिजनचा पुरवठा, खाटांची व्यवस्था आदी सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या.

नागरिक महसूल विभागाकडे शासन या भावनेने बघतात. नागरिकांचे वाद, तंटे मिटविण्यासाठी महसूल विभाग काम करीत असतो. त्यामुळे महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी मोठी आहे. नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी सर्वांनी चांगले काम करावे. शासनाने ऑनलाइन उपलब्ध करून दिलेल्या सेवांमध्ये सातत्य ठेवावे,
— राजेश देशमुख, अपर जिल्हाधिकारी

फेरफार अदालतीचे आयोजन करून प्रलंबित नोंदी निर्गमित करण्याच्या कामांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. संगणकीकृत सातबारा करण्याचे काम मोहीम स्वरूपात राबवून अपेक्षित उद्दिष्ट साध्य करावयाचे आहे. महसूल वसुलीमध्ये जिल्ह्याने विक्रमी कामगिरी केली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियमानुसार विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्यातही जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे. येत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानासोबत अद्ययावत राहून ई-पीक पाहणी, ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी आदी विविध प्रकल्पांवर काम गतीने काम करायचे आहे.

जिल्ह्यातील विविध पायाभूत प्रकल्पांसाठी भूसंपादन कार्यवाहीला गती देऊन नियोजित प्रकल्प वेळेत कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकरी त्यांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहू नये याबाबत दक्षता घ्यावी.

Dnyaneshwar: