वाढती गुन्हेगारी पोलिसांची ‘अग्निपरीक्षाच’

पुणे : शहरात वाढत असलेली गुन्हेगारी, खुनाचे सत्र, महिला अत्याचार, अवैध धंद्यांचा सुळसुळाट, गुन्हेगारांना मिळणारा राजकीय वरदहस्त, दरोडे, टोळीयुद्ध, सायबर गुन्ह्यांत झालेली वाढ अशा अनेक प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस कुठल्या अ‍ॅक्शन मोडमध्ये जातील, यामध्येच तर आता पोलिसांची खरी अग्निपरीक्षा असेल. पुढे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पोलिस दलातील गुन्हे शाखेची पुनर्रचना
शहरात वाढलेल्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या रचनेत महत्त्वाचा सामाजिक सुरक्षा विभाग थेट पोलिस उपायुक्त गुन्हे शाखेच्या एकच्या अखत्यारित काम करणार आहे. त्यासोबतच तांत्रिक विश्लेषण विभागदेखील उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली असणार आहे.

शहरात अलिकडच्या काळात कमालीची गुन्हेगारी वाढली आहे. शहरातील खुनांची मालिका ही पोलिसांपुढील तीव्र डोकेदुखी बनली आहे. बहुतांश खुनाच्या घटनांमध्ये पूर्ववैमनस्य, दारू हे कळीचे मुद्दे ठरले आहेत. त्याचप्रमाणे टोळ्यांचे वर्चस्व, घरगुती वाद, प्रेमप्रकरण आणि विवाहबाह्य संबंध अशी अनेक कारणेही खुनांमागे कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे. शहरात अवैध धंद्यांमध्ये वाढ होत आहे. जाळपोळ, तोडफोड, हाणामार्‍या अशा गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ होत आहे. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसून येते.

संघटित गुन्हेगारीचा मागोवा पुणे पोलिस घेत आहेत. हत्येच्या प्रयत्नाचे इतक्या मोठ्या प्रमाणावर गुन्हे नोंदवले जात आहेत. गुन्हेगारांच्या जवळपास ३० टोळ्यांचा पर्दाफाश कारण्यात आला आहे. वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत.

अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त (पुणे)

शहरात महिन्याभरापूर्वी कोथरूडमध्ये एका १६ वर्षीय अल्पवयीन मूक-बधिर मुलाचा खून करून त्याचा मृतदेह पोत्यात बांधून फेकण्यात आला होता. खडकी भागात बायकोला नांदवायला पाठवत नसल्याच्या रागातून जावयाने सासर्‍याची चाकूने सपासप वार करून हत्या केली. सिंहगड रस्त्यावर नांदेड फाट्याजवळ एका तरुणाची भरदिवसा पाच ते सहा जणांनी कोयत्याने वार करून हत्या केली. लोकमान्यनगर येथे प्रेयसीच्या मामाने तरुणाचा कोयत्याने वार करून खून केला. या घटनेत ५ ते ६ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखलसुद्धा केला. या सर्व घटनांमध्ये आरोपींच्या मुसक्या आवळण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही. परिणामी गुन्हेगारींमध्ये कमालीची वाढ होत आहे.

गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगारांचे प्रमाणही जास्त
वर्षभरात पोलिस प्रशासनाने अनेक गुन्ह्यांची उकल करीत अनेक गुन्हेगारांना जेरबंद केलेले आहे. यातील बहुतांश गुन्हेगार हे १८ ते २५ वयोगटातील आहेत. काही बालगुन्हेगार आहेत. मोठ्या गुन्ह्यातील बालगुन्हेगारांना काही काळ बालसुधारगृहात ठेवून सोडून देण्यात येते, तर छोट्या गुन्ह्यातील बालगुन्हेगारांना अटक न करताच समज देऊन सोडून देण्यात येते. त्यामुळेच या बालगुन्हेगारांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ मिळते, तर विविध गुन्ह्यातील आरोपी अटक होऊनही जामिनावर बाहेर येऊन साक्षी, पुराव्याअभावी निर्दोष सुटून गुन्हेगारीजगतात स्थान निर्माण करतात.

दहशत पसरविण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल : शहरातील बालाजीनगरमध्ये असेच प्रकार वारंवार समोर येत आहेत. हातात कोयते घेऊन नागरिकांना भर रस्त्यात मारहाण करणे. एवढेच नाही तर फुकट भाजी दिली नाही, म्हणून भाजीवाल्यांना मारहाण करणे असे गुन्हेगारीचे सत्र इथे सुरूच आहे. हे सर्व प्रकार करताना व्हिडीओ काढायची आणि दहशत पसरावी, म्हणून चक्क व्हिडीओदेखील काढण्यात आले आहेत. मारहाण, धमक्या देणे, परिसरात दहशत पसरवणे, मुलींची छेड काढणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. यासंदर्भात नागरिक जेव्हा तक्रार देण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यामध्ये जातात, तेव्हा तिथे मात्र त्यांना निराशाच मिळते. इतकेच काय, तर तुम्ही या परिसरात राहू नका, असे उलट उत्तर पोलिस देत असल्याचे नागरिक सांगतात.

गुन्हेगारीमध्ये तरुणाईची जादा भर : आळंदीतील पद्मावती झोपडपट्टी आणि विस्तारित भागात राहणारी तरुण मुले गेल्या पंधरा वर्षांत स्वतःची गँग करून गुन्हेगारी कारवाया करीत आहेत. कोयत्याच्या सहाय्याने खून ही त्यांची विशेषता आहे. यातील काही आरोपींना खुनाच्या गुन्ह्यात सजा लागलेली असून कारागृहात होती. मात्र कोरोनाकाळात त्यांची काही महिन्यांपुरती सुटका झाली आणि बाहेर आल्यानंतर दहशत माजविण्यास सुरुवात केली. कुणी पॅरोलवर सुटले, तर कुणी कोरोनामुळे सुटले. मात्र त्यानंतर औद्योगिक भागातील ठेकेदार असो की भाजीविक्रेते, अवैध दारूविक्रेत्यांकडून पैसे बळजबरीने गोळा करतात. मात्र, त्यांच्याविरोधात कुणीही तक्रार देण्यास पुढे न आल्याने कारवाई केली जात नाही. परिणामी अशा गुन्ह्यांत वाढ होते.

सुशिक्षित गुन्हेगारांच्या संख्येत लॉकडाऊनकाळात वाढ : सायबर सायकॉलॉजिस्ट निराली भाटिया यांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनदरम्यान अनेक सुशिक्षित तरुणांच्या नोकर्‍या गेल्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकटे उभी राहिली होती. गेल्या सहा महिन्यांपासून बरेच नागरिक घरामध्ये अडकून पडल्यामुळे मानसिक दबावाखाली असलेल्या या व्यक्तींचा अधिकाधिक संपर्क इंटरनेटवर सायबरविश्वाशी आला होता. यादरम्यान, स्वतःच्या मनात असलेली चीड व्यक्त करण्यासाठीही काही वेळा सायबर गुन्हेगारीसारख्या कृतीत वाढ होत गेली.

Prakash Harale: