मुंबई | Rohit Pawar On BJP – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत चांगलीच फुट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झालं. तेव्हापासून राज्यात शिंदे गट विरूद्ध ठाकरे गट तर दुसरीकडे महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा सामना रंगताना पाहायला मिळत आहे. तसंच भाजपनं शिवसेना फोडली असा आरोप ठाकरे गटासोबतच राष्ट्रवादी आणि काँग्रेसनंही केला आहे. या पार्श्वभूमीवर आता पुढचं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असू शकतो, असं आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटलं आहे.
“शिवेसना एक मोठा पक्ष होता. त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं दबाव आणून, राजकारण करून तो पक्ष फोडण्यात आला. पण दुसरं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असू शकतो हे मी बोललो होतो. कारण शिवसेनेनंतर दुसरा मोठा पक्ष राष्ट्रवादी आहे”, असं रोहित पवार म्हणाले.
“टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस फोडणं शक्य नाही. कारण शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे चालत आहोत. एक कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी त्यांना यश येणार नाही. पण ज्यांना लोकशाही माहीत नाही. दडपशाही, फोडाफोडी माहिती आहे, त्यांचं दुसरं टार्गेट कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस असेल. कारण तोच दुसरा मोठा पक्ष आहे”, असंही रोहित पवार म्हणाले.