मुंबई | Rohit Pawar – सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील 8 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे आता शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून अजित पवार गटावर हल्लाबोल केला जात आहे. यामध्ये आता शरद पवार यांच्यासोबत असणारे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यावर निशाणा साधला.
रोहित पवार यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी दिलीप वळसे पाटील यांची राजकीय कारकिर्द नमूद केली आहे. तसंच अजून काय पाहिजे? पवार साहेबांनी स्वत:च्या लेकराप्रमाणे जपलेला नेता म्हणून वळसे पाटील साहेब तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुम्हीच तर होतात ज्यांच्यावर साहेब सर्वाधिक विश्वास ठेवायचे. हे सगळं वाचल्यानंतर लोक म्हणतील असा अन्याय आमच्यावरपण व्हायला पाहिजे, असंही राहित पवारांनी ट्विटमध्ये शेअर केलेल्या फोटोत नमूद केलं आहे.
पुढे रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “मा. वळसे-पाटील साहेब आदरणीय पवार साहेबांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे जपलेला नेता म्हणून तुम्हाला महाराष्ट्र ओळखतो. तुमच्यावर तर साहेबांचा सर्वाधिक विश्वास होता. पण अचानक असं काय संकट आलं की तुम्हाला आपली निष्ठा गहाण ठेवावी लागली? आपल्या विचारधारेला मूठमाती द्यावी लागली, हे महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय. केवळ सत्तेसाठी अशा प्रकारची बंडखोरी आपल्या सारख्या जेष्ठ नेत्याकडून अपेक्षित नव्हती. असो!”
“प्रत्येक संकटावर मात करण्याची ताकद आमच्या सह्याद्रीत आहे. सह्याद्रीच्या बाजूने संपूर्ण महाराष्ट्र उभा असून हा सह्याद्री नव्या जोमाने आणि नव्या ताकदीने उभा राहीलच, परंतु वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का?”, असा सवालही रोहित पवारांनी केला आहे.