मुंबई | Rohit Pawar On Ram Shinde – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यात सध्या चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. राम शिंदेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कारखान्यावर कारवाईची मागणी केली आहे. याच संदर्भात आता रोहित पवार यांनी राम शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.
रोहित पवार यांनी मुदतीच्या आधी बारामती ॲग्रो हा साखर कारखाना सुरू केला म्हणून राम शिंदेंनी प्रथम साखर आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर साखर आयुक्तालयानं याप्रकरणी रोहित पवारांना क्लिन चीट दिली होती. त्यानंतर राम शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत बारामती ॲग्रोवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावरून रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटलात, माझ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. जी कारवाई व्हायची ती होऊ द्यात. मात्र आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडं शेतकऱ्यांसाठी मदत तरी मागायची, असं रोहित पवार म्हणाले. लहान मुलांना चाॅकलेट नाही मिळाल्यावर ते कसं करतं तसं काम आमचे विरोधक करत आहेत, असा खोचक टोलाही रोहित पवार यांनी राम शिंदेंना लगावला आहे.
पुढे रोहित पवार म्हणाले, सामान्य लोकांना जर आम्ही मदत करत असू, कारखाना सुरू करून शेतकऱ्यांना जर मदत करत असू तर जी कारवाई व्हायची असेल ती हाऊ द्या. तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटला होता तेव्हा तुम्ही त्यांना ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट पंचनामे व्हावेत असे एकदा पत्र द्यायचं होतं. आमच्या विरोधकांना फक्त राजकारण कळतं. विरोधकांना आम्ही उत्तर देऊ त्याची काळजी तुम्ही करू नका. आम्ही तुमच्याबरोबर आहे. त्यांना शेतकऱ्यांचं हित माहित नाही, ते त्यांना झेपणार पण नाही. म्हणूनच 2019ला तुम्ही मतांच्या माध्यमातून आशिर्वाद दिल्याचे पवार म्हणाले. विकासकामं करत असताना अडचणी येत असतात असंही रोहित पवार यावेळी म्हणाले.