अहमदनगर : (Rohit Pawar On Sudhir Mungantiwar) भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी उल्लेख करत टीका केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याव्यतिरिक्त एकाही नेत्याने चकार शब्द काढला नव्हता. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पक्षातील नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत.
“महाराष्ट्रात काही नवीन तयार झालेले नेते खालच्या पातळीवर जाऊन बोलत पदाची अपेक्षा करत असावेत. भाजपचे स्वयंघोषित नेते खालच्या पातळीवर बोलतात तेव्हा वरिष्ठ नेते शांत असतात. याचा अर्थ त्यांचेही याला पाठबळ असल्याचं दिसतं. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती,” अशा शब्दांत रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
“शरद पवारांनी अनेक नेत्यांना मोठं केलं. पण, शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन बोललं जातं, तेव्हा कार्यकर्तेच लढतात. ही गोष्ट पाहिल्यावर मलाही खंत वाटते. ज्या नेत्यांनी विविध पद भूषावली आहेत, ते याबद्दल काहीच बोलत नाहीत. फक्त अजित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, बाकीचे सर्व शांत बसले आहेत. आम्ही कार्यकर्ता म्हणून लढत राहू. शरद पवारांवर जो कोणी बोलेल, त्याला उत्तर देऊ. पण, नेते गप्प का बसतात हे कळत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.
भाजपमध्ये ओबीसींचा सन्मान होत नाही, असा आरोप राष्ट्रवादीने केला होता. यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, “ओबीसांचा पंतप्रधान झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नेत्यांच्या पोटात दुखत आहे. काँग्रेसचा पंतप्रधान कोण आहे? तर एक ब्राह्मण आहे, जो जाणवं घालतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा २२ वर्षांपासून अध्यक्ष कोण आहे? मराठा शरद पवार, तो आम्हाला अक्कल शिकवणार का? जनतेलाही हे समजलं पाहिजे की, मायावी चेहरे घेऊन बसलेल्या या लोकांपासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे. हे लोक आपल्यासमोरचा मोठा धोका आहेत.”