“आदित्य ठाकरे वेदांताबाबत केवळ…”, शिवसेनेच्या ‘जनआक्रोश मोर्चा’वर रोहित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई | Rohit Pawar Reaction On Aditya Thackeray’s Janaakrosh Morcha – वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta-Foxconn Project) राज्याबाहेर गेल्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली आहे. तसंच शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शनिवारी (24 सप्टेंबर) पुण्याच्या वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढला होता. या मोर्चासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी रोहित पवार म्हणाले, “आदित्य ठाकरे वेदांताबाबत केवळ बोलत नाहीत, तर ते पुरावेही देत आहेत. ते पुरावे बघितल्यानंतर असं दिसत आहे की, राज्यातल्या बऱ्याच कंपन्या गुजरात आणि इतर राज्यात जात आहेत. योगायोग म्हणजे, डिसेंबर महिन्यात गुजरातची निवडणूक आहे, त्यानंतर कर्नाटकची आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राची निवडणूक आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी लोकांच्या हितासाठी सुरू आहेत की राजकारणासाठी, असा प्रश्न पडतो. जर हे राजकारणासाठी सुरू असेल तर हे महाराष्ट्राच्या हिताचं राजकारण आहे की, दुसऱ्या राज्याच्या हिताचं राजकारण, हे बघितलं पाहिजे. खरं तर आदित्य ठाकरे हे लोकांत जाऊन वस्तूस्थिती सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.”

दरम्यान, फाॅक्सकाॅन प्रकल्प (Foxconn Project) महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात पुण्याच्या वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी त्यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला. यावेळी युवासेनेचे कार्यकर्ते सरकारविरोधात आक्रमक झाले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.  फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनात रोष आहे. महाविकास आघाडीचं सरकार असतं तर हा प्रकल्प महाराष्ट्रात शंभर टक्के आणला असता. परंतु, आज राज्यात कंपन्या येतात की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रकल्प कोणत्या राज्यात गेला याचं वाईट वाटत नाही. आपल्या तरूणांचा रोजगार बाहेर गेला यामुळे तरूणांच्या मनात सरकार विषयी रोष आहे. फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येणार हे ठरलं असताना सरकार बदलल्यानंतर लगेच तो गुजरातला कसा गेला? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. सत्तांतर झालं नसतं तर आज हा प्रकल्प महाराष्ट्रात असता असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.

Sumitra nalawade: