कर्णधार रोहित मोठा विक्रम रचणार? 100 व्या सामन्यात हव्यात फक्त 47 धावा!

Rohit Sharma New Record : वनडे वर्ल्डकप 2023 मध्ये उद्या (दि. 29) लखनौच्या भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर भारत लीग स्टेजमधील आपला सहावा सामना खेळणार आहे. हा सामना गतविजेत्या इंग्लंडसोबत असून भारताने आपले पाचही सामने जिंकून 10 गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्माचा कर्णधार म्हणून हा 100 वा सामना असणार आहे. त्यामुळे टीम इंडिया आपल्या लाडक्या कर्णधाराला सलग सहाव्या विजयाची भेट देण्यासाठी उत्सुक असेल. तर रोहित शर्मा देखील एक माईल स्टोन पार करण्याच्या तयारीत असेल. रोहित शर्मा इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात आपल्या 18000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करू शकतो.

रोहित शर्मा ज्यावेळी इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानात येईल त्यावेळी तो कर्णधार म्हणून आपला 100 वा सामना खेळत असेल. रोहित शर्माने तीनही फॉरमॅटमध्ये मिळून आतापर्यंत 99 सामन्यात भारताचे नेतृत्व केलं आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने 73 सामन्यात विजय मिळवला असून 23 सामन्यात भारताला पराभव सहन करावा लागला आहे. 2 सामने टाय झाले आहेत. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाचे विनिंग पर्सेंटेज हे 73.73 टक्के इतके आहे. त्याने कर्णधार म्हणून दोनवेळा एशिया कप, निदाहस ट्रॉफी आणि बॉर्डर – गावसकर ट्रॉफी देखील जिंकली आहे.

रोहित शर्मा 18000 धावा पूर्ण करण्याच्या जवळ पोहचला आहे. त्याने इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात 47 धावा केल्या तर त्याच्या 18000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण होतील. रोहित शर्माने तीनही प्रकारात मिळून आतापर्यंत 456 सामने खेळले आहेत. त्यात 476 डावात त्याने 17953 धावा केल्या आहेत. यात 45 शतके, 98 अर्धशतके ठोकली आहे. त्याने 264 धावांची सर्वोच्च खेळी केली आहे. त्याने 1703 चौकार आणि 568 षटकार ठोकले आहेत.

Prakash Harale: