पुणे | गेल्यावर्षी राज्यभर गाजलेल्या पुण्यातील (Pune) रुबी हॉल हॉस्पिटलमधील अवैध किडनी रॅकेट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चौकशी समिती नेमली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रकांत भडंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अवयव प्रत्यारोपणातील तज्ज्ञांचाही समावेश असणार आहे. पुढील तीन महिन्यांत या समितीने अहवाल सादर करणे अपेक्षित आहे.
चौकशी समिती सर्व आरोपांची सखोल चौकशी करून त्याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करणार आहे. तसेच, चौकशी दरम्यान, काही अनियमितता आढळून आल्यास त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी करावयाच्या उपाययोजनांची शिफारससुद्धा गठीत समिती करणार आहे. संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची शिफारसही समिती करेल, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत, म्हणून उपाययोजनाही समिती सुचविणार आहे.
किडनी रॅकेट प्रकरण नेमके काय?
सारिका सुतार या महिलेला पंधरा लाख रुपयांचे आमिष दाखवून २४ मार्च २०२२ रोजी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले. त्यासाठी महिलेकडून आरोपी अमित साळुंखे याने किडनी घेतली. आरोपीने बनावट कागदपत्रे प्रत्यारोपण समितीकडे सादर करून परवानगी घेतली होती. सुतार यांना पैसे न मिळाल्याने फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अवैध किडनी प्रत्यारोपणाबाबत संबंधित रुबी हॉल क्लिनिकचा सहभाग आहे, नाही ? किंवा कसे ? याची चौकशी आता लवकरच होईल.
यांचा समावेश असणार समितीत…
पुण्याचे अपर पोलीस आयुक्त
( प्रशासन ) अरविंद चावरिया, वैद्यकीय शिक्षण व संशोधन माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, बॉम्बे हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजिस्ट डॉ. श्रीरंग बच्चू, ग्लोबल हॉस्पिटलमधील नेफ्रोलॉजिस्ट डॉ. भरत शाह, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अरुण तिरलापूर, क्रिटिकेअर रुग्णालयातील प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. वत्सला त्रिवेदी, मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा विभागाचे आरोग्य सेवा सहायक संचालक, आरोग्य सेवा आयुक्तालयातील विधी सल्लागार भाग्यश्री रंगारी, तसेच या समितीचे सदस्य सचिव म्हणून आरोग्य सेवा संचालक यांची नेमणूक करण्यात आली आहे.