रुक जा रात ठहर जा चंदा…

मधुसूदन पतकी

सावित्रीची आठवण व्हावी असं काही. पतीपत्नीचं नातं केवळ श्वास सुरू आहेत तेवढ्यापुरतं नाही तर जन्मजन्मांतरीचं. सात जन्म आपल्यात म्हणतात ते. शरीरे दोन असली तरी आत्मा, मन एक. एकरूप झालेलं. अद्वैताचे अप्रतिम भाव गाण्यात प्रतिबिंबित होतात.

दिल एक मंदिर. खरंतर हा तेलगू चित्रपटाचा रिमेक. नेंजिल या आलम हा मूळ चित्रपट. सी. व्ही. श्रीधर यांनी तो दिग्दर्शित केला. त्याला लोकमान्यता आणि राजमान्यता मिळाली. बॉक्स ऑफिसवर तो तुफान चालला. त्यानंतर दिल एक मंदिर हा चित्रपट हिंदीत श्रीधर यांनीच दिग्दर्शित केला. राज बलदेव राज यांचे संवाद. चित्रपटाला फिल्मफेअर अ‍ॅवॉर्डचा सन्मान प्राप्त. नॉमिनेशन. राजकुमारला सहायक अभिनेत्याचा पुरस्कार. संवादलेखनाचा पुरस्कार. राजेंद्रकुमारचे नाव सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी नामांकन. मीनाकुमारीचा अभिनय. खरंतर चित्रपटाचा विषय फार वेगळा नाही. प्रेमाचा त्रिकोण. एकाचा त्याग. अत्यंत समजूतदारपणाचा कळस. म्हणजे वास्तवात तिघंजण इतक्या समजूतदारपणाच्या पातळीवर यावेत हे आश्चर्यच म्हणावे लागेल. मेलोामा. भावनांचा, निर्लेपपणाचा अतिउत्कट आविष्कार. त्यागाची परिसीमा. सगळं या चित्रपटात. तमिळ, कानडी चित्रपटाचा प्रेक्षक खूपच भावनिक. चित्रपट, अभिनेते-अभिनेत्रींचं पूजन करावं हा त्यांचा आदरभाव. त्यातला हा चित्रपट…

राजकुमार, मीनाकुमारी पतीपत्नी. राजकुमारला कर्करोग होतो. उपचार राजेंद्रकुमार डॉक्टर म्हणून करणार असतो. तो मीनाकुमारीचा पूर्वायुष्यातला प्रियकर. तो आपल्या पतीचा घात कल अशी भीती मीनाकुमारीला. राजेंद्रकुमार त्याचे प्राण वाचवतो. या धावपळीत त्याचेच प्राण जातात. दरम्यान, राजकुमार आपलं बरंवाईट झालं तर राजेंद्रकुमारशी लग्न करायला मीनाकुमारीला सांगतो. हा सगळा चांगुलपणाचा भाग. सगळी गाणी भन्नाट. शैलेंद्र, हसरत जयपुरी आणि शंकर जयकिशन… आता बोला.

रुक जा रात ठहर जा चंदा. शैलेंद्रचे शब्द. लग्नानंतर पहिल्या रात्रीच्या मधुर क्षणांचं हे गीत. त्यावेळची अवस्था शब्दात सांगता येण्यासारखी थोडीच असते. मिलनाचे ते क्षण संपूच नये असे. चंद्राला थांबायची विनंती. कारण तो थांबला की, रात्र दीर्घ होईल. काळ थांबेल. मनातल्या आकांक्षांचा कल्लोळ त्या चांदणरात्री अमृतमयी व्हावा यासाठी विनंती. आपल्या संबंधांची, प्रेमाची ही कहाणी चिरंतन व्हावी. आचंद्रसूर्य राहावी अशी. खरंतर या गाण्याची परिस्थिती करुण रसातली. जीवनमृत्यूच्या सीमाषेवर उभा नायक आणि त्याची आपल्या पत्नीला पहिल्या रात्रीच्या वेषात पाहायची कदाचित अखेरची इच्छा. पत्नी त्याचा हट्ट पूर्ण करते, मात्र अखेरच्या कडव्यात तिची भीती व्यक्त होते. उद्याचे भय आणि काळाची काळी छाया आपल्या दोघांना समान आहे. दोन शरीरं असली तरी जीव एकच आहे ना, आयुष्यभर सोबत आहेच, मात्र त्यानंतरही सोबत असेन. कायम तुझी असेन. अतिशय सुंदर शब्द. सावित्रीची आठवण व्हावी असं काही. पतीपत्नीचं नातं केवळ श्वास सुरू आहेत तेवढ्यापुरतं नाही, तर जन्मजन्मांतरीचं. सात जन्म आपल्यात म्हणतात ते. शरीर दोन असली तरी आत्मा, मन एक. एकरूप झालेलं. ते अद्वैताचे अप्रतिम भाव गाण्यात प्रतिबिंबित होतात. या चित्रपटातल्या गाण्यासाठी मीनाकुमारी सतार शिकली. हे प्रयत्न म्हणजे कलेशी एकरूपता. नाही का!

Sumitra nalawade: