विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांत राडा; पहा नेमकं काय घडलं

मुंबई – Monsoon Session : विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असताना प्रत्येक दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी केली जात आहे. मात्र, आज तर लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी राडाच केला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांतील वाद धक्काबुक्की आणि शिवीगाळ पर्यंत गेला आहे. सत्ताधारी पक्षांतील आणि विरोधी पक्षांतील या धक्काबुक्कीच्या प्रकारानंतर राज्यातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापलेलं दिसंत आहे.

नेमकं काय घडलं ?

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधी पक्षातील नेत्यांकडून विधान भवनाच्या पायऱ्यांवर उभे राहून शिंदे गटातील आमदारांच्या विरोधात घोषणाबाजी केली जात होती. ‘५० खोके ओके आणि खाऊन माजलेत बोके’ अशा प्रकारच्या घोषणा शिंदे गटाच्या भाजपमध्ये जाण्यावरून विरोधक देत होते. मात्र आज अचानक त्याच पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षांतील नेत्यांनी विरोधकांच्या अगोदर येऊन त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. ‘लवासाचे खोके बारामती ओके’ अशाप्रकारच्या घोषणा शिंदे गटातील आणि भाजपच्या नेत्यांकडून केल्या जात होत्या. दरम्यान, विरोधी पक्षांतील नेत्यांकडून आमची जागा हायजॅक करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. यानंतर बोलण्या बोलण्यात प्रकरण बाचाबाची पर्यंत पोहोचले. यावेळी शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमोल मिटकरी यांच्यात मोठ्या प्रमाणात वाद झाला.

दरम्यान, सत्ता धाऱ्यांकडून आम्हाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आल्याची तक्रार मिटकरी अमोल यांनी केली. त्याचबरोबर ‘आम्ही दिलेल्या पन्नास खोके ओके च्या घोषणा त्यांना जिव्हारी लागल्याने आज त्यांनी घोषणाबाजी केली’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत?

दरम्यान या प्रकरणात बोलताना शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी विरोधकांना इशाराच दिला आहे. “आम्ही यांच्या भ्रष्टाचाराचा सगळा इतिहास बाहेर काढला. कोरोना काळ, सिंचन घोटाळा, अनिल परब, नवाब मलिक यांची वस्तुस्थिती बाहेर काढली. आणि त्यांनी आम्हाला घोषणाबाजी करताना अडवले. गोंधळ उभा केला. मग आम्ही काय बांगड्या भरल्यात काय. आम्हीही जशास तसं उत्तर देऊ. अंगावर येईल त्याला आम्ही शिंगावर घेऊ.” असा इशारा गोगावले यांनी दिला. “ते आम्हाला काय धक्काबुक्की करणार आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली” असंही गोगावले यावेळी म्हणाले.

Dnyaneshwar: