मुंबई | बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसराई सुरु आहे. कलाकार एकामागे एक लग्नबंधनात अडकत आहेत. नुकतेच अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचा शाही विवाह सोहळा जैसलमेर येथे थाटात पार पडला. त्यानंतर आता क्रिती सेनॉन आणि प्रभास यांचाही लवकरच साखरपुडा होणार असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत.
क्रिती सेनॉन आणि प्रभास हे गेल्या अनेक महिन्यांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. लवकर हे दोघं ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यात प्रेम निर्माण झालं असंही बोललं गेलं. तर आता लवकरच दोघं डेस्टिनेशन एंगेजमेंट करणार आहेत अशी चर्चा रंगली आहे.
एका परदेशी सेन्सॉर बोर्डाचे सदस्य असलेले उमैर संधू यांनी क्रिती आणि प्रभासच्या साखरपुड्याबद्दल एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, “ब्रेकिंग न्यूज: क्रिती सेनॉन आणि प्रवास यांचा पुढील आठवड्यात मालदीवमध्ये साखरपुडा होणार आहे. मी त्या दोघांसाठी खूप खुश आहे.” हे ट्वीट वाचल्यानंतर दोघांचेही चाहते आनंदी झाले आहेत. पण अद्याप याची कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्याचबरोबर क्रिती किंवा प्रभासने देखील याबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.