मुंबई | रामानंद सागर निर्मित रामायण ही पौराणिक मालिका अत्यंत लोकप्रिय ठरली. अगदी लॉकडाउनच्या काळात घरी बसलेल्या प्रेक्षकांच्या आग्रहाखातर दूरदर्शनने पुन्हा ‘रामायण’ दाखवण्याचा निर्णय घेतला. इतकंच नव्हे तर ‘रामायण’ ही मालिका जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी मालिका ठरली आहे. या पौराणिक मालिकेची जादू इतक्या वर्षांनंतर तसूभरही कमी झालेली नाही. आजही प्रेक्षकांना ही मालिका तितकाच आनंद देते. ‘रामायण’ ही फक्त मालिकाच नाही तर हा मनामनात रुजलेला संस्कार आहे. अलौकिक निष्ठा, पवित्र प्रेम, आणि असामान्य श्रद्धेची गोष्ट असल्याने प्रेक्षक वर्गासाठी ही पर्वणीच होती.
‘रामायण’ मालिकेत रामाची भूमिका अरुण गोविल यांनी तर सीतेची भूमिका दीपिका चिखलिया यांनी साकारली होती. या दोघांची जोडी घराघरात राम-सीता म्हणूनच लोकप्रिय झाली. रामायण ही मालिका 36 वर्षांपूर्वी प्रसारित झाली होती. परंतु आजही त्या दोघांची लोकप्रियता कायम आहे. रामायण मालिकेमुळे अरुण आणि दीपिका हे खऱ्या आयुष्यात जिथे जिथे जातील तिथे लोक हात जोडून त्यांच्यासमोर उभे राहायचे. रामायण मालिकेनंतर या दोघांनी एकत्र काम केलं नाही. परंतु आता प्रदीर्घ कालखंडानंतर अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया पुन्हा एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्या दोघांच्या आगामी प्रोजेक्टमधील काही फोटो आणि व्हिडिओ दीपिका यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावरून हे ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याचे स्पष्ट होत आहे. मालिकेनंतर दीपिका यांनी एक सिनेमात काम केलं होतं, परंतु आता 36 वर्षांनंतर दोघं पुन्हा एकत्र काम करणार आहेत.