मुंबई : (Rupali Thombare Patil On Gulabrao Patil) गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील आणि शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांच्यात संघर्ष सुरु आहे. सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटलांच्या मतदासंघात ‘महाप्रबोधन यात्रा’च्या आयोजित सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे अंधारेंनी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधत ‘दबावतंत्राचा’ वापर केल्याचा आरोप पाटलांवर लावला होता.
या आरोपांना उत्तर देताना गुलाबराव पाटील यांची जीभ घसरली होती. त्यांनी सुषमा अंधारेंचा उल्लेख ‘नटी’ असा केला आहे. “सुषमा अंधारेंना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. त्यांचा पिक्चर कुठेच चालला नाही, त्यामुळे त्या शिवसेनेत आल्या. ठाकरे गटालाही नटीची गरज होती. ज्याप्रमाणे एखादा पिक्चरमध्ये अभिनेत्रीची गरज असते, त्याप्रमाणे यांनाही (ठाकरे गटाला) एखादी बाई पाहिजे होती,” असे गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं.
यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी गुलाबराव पाटील यांचा त्यांच्याच भाषेत समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या, “आता आम्ही सुद्धा पातळी सोडून बोलणार आहोत. गुलाबरावांनी डुकारासारखे तोंड घेऊन वचावचा बोलू नये. आपली पात्रता नाही आहे. सुषमा अंधारेंना ‘नटी’ म्हणत असचाल, तर तुमच्या घरातील ‘नट्या’ बाहेर आणा. त्यांना सुषमा अंधारेंच्या विरोधात मैदानात उतरण्यास सांगा,” असं खणखणीत आव्हान रुपाली पाटील यांनी शिंदे गटातील गुलाबरावांना दिलं आहे.