मुंबई : (Rupali Thombare Patil On Rahul shewale) दिशा सालियान प्रकरणी संसदेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी गंभीर आरोप केल्यानं हा विषय गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चर्चिला जातोय. यानंतर शेवाळेंविरोधातील एक जुनं प्रकरणही समोर आलं आहे. यावरुन आता मोठं घमासान सुरु आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचे आदेशही दिले आहेत. त्यातच आता दुसऱ्यांवर आरोप करणारे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे हे स्वःताच मोठ्या अडचणी सापडले असून त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी शेवाळेंविरोधातील एका प्रकरणातील पीडित महिलेला घेऊन फेसबुक लाईव्ह केलं. तब्बल एक तासाच्या या लाईव्हमध्ये पीडितेनं शेवाळेंवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. फेसबूक लाईव्हमध्ये पीडित महिलेनं म्हटलं की, मी दुबईत काम करते या ठिकाणी मला एका खोट्या गुन्ह्यात अडकवलं गेलं. याच्या चौकशीनंतर १५ डिसेंबर रोजी यातून मी निर्दोष सुटले पण मी भारतात येऊन या प्रकरणावर भाष्य करु नये यासाठी माझं मानसिक खच्चीकरण केलं जातंय. २८ एप्रिल २०२१ रोजी मी मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पण आत्तापर्यंत खासदार शेवाळेंवर गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. या प्रकरणात पोलिसांवर देखील दबाव आणला जात आहे.
राहुल शेवाळे आणि मी दोन वर्षे एकत्र राहत होतो. शेवाळेंनी स्वतःच्या कुटुंबाचा विश्वासघात तर केलाच मलाही त्यांनी फसवलं. त्यांच्याकडून वारंवार माझं शोषण करण्यात आलं, मी भारतात येऊन शेवाळेंचं पितळं उघडं पाडू नये यासाठी माझं मानसिक खच्चीकरण करण्यात आलं. राहुल शेवाळेंच्या पत्नीला सर्वकाही माहिती आहे, माझ्याकडं याचे पुरावे देखील आहेत. जेव्हा वेळ येईल तेव्हा हे पुरावे कोर्टात मी सादर करणार आहे. दुबईत माझा टेक्स्टाईलचा बिझनेस होता पण राहुल शेवाळेंनी माझं करिअर आणि प्रतिमा उद्ध्वस्त केली आहे. माझ्यासोबत जे घडलंय ते इतर कोणाहीसोबत घडायला नको म्हणून मी गेल्या १० महिन्यांपासून लढत आहे. मला तोंड बंद करण्यासाठी ५ कोटी रुपयांची ऑफर दिली गेली होती. मला जीवेमारण्याची धमकीही देण्यात आली.