-मधुसूदन पतकी
बँक चालवण्यासाठी नियम, कायदे महत्त्वाचे असतात.सहकारात एकमेकांना साहाय्य करायची भूमिका असेल, तर किमान साधनशुचिता पाळली पाहिजे हे नक्की.
गुरुवारी आर्थिक क्षेत्रातल्या दोन महत्त्वाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या.त्यातली एक होती पुण्याच्या रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्यात आला. मात्र बँक अवसायनात काढण्याच्या आदेशावर दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने त्याला चार आठवड्यांच्या स्थगितीचा आदेश दिला आहे. रुपी बँकेच्या संचालक आणि ठेवीदारांना आता चार आठवड्यांत बँक वाचवण्यासाठी पुढील पावले उचलली पाहिजेत.
दुसरी बातमी होती लक्ष्मी सहकारी बँकेची. या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. सोलापूर येथील लक्ष्मी सहकारी बँकेची आर्थिक स्थिती हलाखीची झाल्याने रिझर्व बँकेने या बँकेचा परवाना रद्द केला आहे. अहवालानुसार बँकेकडे पुरेसे भांडवल नाही, तसेच भविष्यात ते वाढण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत ठेवीदारांच्या हितास प्राधान्य देण्याच्या दृष्टीने परवाना रद्द केला.
एकूणच सहकारी क्षेत्रातील बँका आणि इतर संस्था यांची परिस्थिती दिवसेंदिवस खालावताना दिसत आहे. राजकारणाचा संबंध ज्या संस्थांशी आला त्या संस्था संपल्या आहेत. सहकारी साखर कारखाने खासगी केल्यावर फायद्यात चालतात, तर सहकारात तोट्यात. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रात सहकार चळवळ जोम धरायला लागली तेव्हा सहकार आणि राजकारणातील व्यक्ती एकत्र काम करू नका. राजकारणातल्या व्यक्तींनी सहकारी संस्थांमध्ये सक्रिय सहभागी होऊ नका असे सांगितले होते. मात्र आज राजकारणीच सहकारी क्षेत्रात दादागिरी करताना दिसत आहेत. त्यात बँकाही आहेत.
गेल्या वर्षभरात ६८ बँका बंद पडल्यात.यात राज्यातील एकूण १४ बँकांचा समावेश आहे. दुसऱ्या बँकांमध्ये विलीन झालेल्या लहान बँकांची संख्या ४२ आहे. पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना त्यांच्या विचारानुसार जास्त संख्येच्या लहान बँका ठेवण्यापेक्षा मोठ्या आर्थिक आकारमानाच्या कमी बँका ठेवण्यावर जोर होता.
या दरम्यान सातारा येथील युनायटेड वेस्टर्न बँक ही आयसीआयसीअायमध्ये विलीन झाली होती. ती बँक सहकारी नव्हती, तरी ही चिदंबरम धोरणानुसार बँक संपली होती. व्यापारी बँका, सहाकारी बँका आणि सरकारी बँका या तीन बँका त्यांना एकाच बँकेच्या नावाखाली ठेवायच्या होत्या. मात्र ते त्या वेळी शक्य झाले नाही.
बँकावर असलेला ठेवीदार, खातेदारांचा विश्वास महत्त्वाचा असतो. बँक चालवण्यासाठी नियम, कायदे महत्त्वाचे असतात. काही जण ते टाळून बँकांना फसवून परदेशात पळून जातात.सहकारात एकमेकांना साहाय्य करायची भूमिका असेल, तर किमान साधनशुचिता पाळली पाहिजे हे नक्की.