रशिया-युक्रेन युद्ध केव्‍हा थांबणार? ट्रम्प यांनी पुतीन यांच्याशी केली महत्त्वपूर्ण चर्चा

रशिया-युक्रेन युद्धावर ट्रम्प यांची पुतीन यांच्याशी चर्चा

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. युक्रेनमधील युद्ध संपण्यासह इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर दोन्‍ही नेत्‍यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली. दरम्‍यान, नुकत्याच झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ट्रम्प यांनी ७० हून अधिक जागतिक नेत्यांशी संवाद साधला आहे. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा समावेश आहे.

युक्रेनमधील युद्ध वाढवू नये…

यासंदर्भात ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटलं आहे की, “नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्‍यांनी युक्रेनमधील युद्ध वाढवू नये असे आवाहन केले आहे. तसेच दोन्ही नेत्यांनी युरोप खंडातील शांततेच्या उद्दिष्टावर चर्चा केली आणि ट्रम्प यांनी युक्रेन युद्धाच्या लवकर निराकरणावर चर्चा करण्यासाठी आगामी चर्चेत सहभागी होण्यात स्वारस्यही दाखवले आहे.”

ट्रम्प हे २० जानेवारी २०२५ रोजी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. युक्रेनला ट्रम्प-पुतिन फोन संभाषणाची माहिती देण्यात आली आहे. ट्रम्प यांनी फ्लोरिडामधील आपल्‍या रिसॉर्टमधून पुतीन यांच्याशी संभाषण केले. दोन्ही नेत्यांमधील संभाषणाची माहिती असलेल्या एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, या संभाषणा दरम्यान ट्रम्प रशियाबद्दल बोलले. त्‍यांनी पुतिन यांना युक्रेनमधील युद्ध न वाढवण्याचा सल्ला दिला. युरोपमधील अमेरिकेच्‍या मोठ्या लष्करी उपस्थितीची आठवणही त्‍यांनी करून दिली.

Rashtra Sanchar: