मुंबई | Rutuja Latke – शिवसेना आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्वच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, त्या मुंबई मनपाच्या कर्मचारी असल्यानं त्यांचा राजीनामा महापालिकेनं मंजूर केला नव्हता. त्याविरोधात ठाकरे गटानं हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, आता ऋतुजा लटकेंना मुंबई हायकोर्टानं दिलासा दिला आहे. लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.
आज ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी ऋतुजा लटके यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलं आहे की, ऋतुजा लटके यांनी राजीनामा 2 सप्टेंबर रोजी दिला. त्यानंर 29 सप्टेंबर रोजी राजीनामा फेटाळण्यात आला. 3 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. आम्ही नियमांनुसार मुंबई महापालिकेकडे राजीनामा सुपूर्द केला. एक महिन्याचा नोटीस पिरियड पूर्ण करायचा नसेल तर एक महिन्यांचा पगार द्यावा लागेल असं सांगण्यात आलं. एक महिन्याचा पगार कोषागरात जमा केला असल्याचं लटके यांच्या वकिलानं सांगितलं.
दरम्यान, ऋतुजा लटके आणि मुंबई महापालिका अशा दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर हायकोर्टानं दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास आपला निकाल दिला. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत लटके यांना राजीनामा स्विकारल्याचं पत्र द्या, असा आदेश हायकोर्टानं मुंबई महापालिकेला दिला आहे. या परिस्थितीत आम्हाला हस्तेक्षेप करावा लागत आहे, अशी टिप्पणीही यावेळी हाकोर्टानं निर्णय देताना केली.